दुबई एअर शोमधून अमेरिकेची माघार
भारताच्या मृत चालकाला मानवंदना देण्याचा निर्णय
वृत्तसंस्था / दुबई
दुबई येथे झालेल्या एअरशोवर अमेरिकेच्या विमानपथकाचे प्रमुख टेलर हिस्टर यांनी टीका केली आहे. या एअरशोमध्ये भारताचे तेजस विमान कोसळून शनिवारी मोठा अपघात झाला होता. या अपघातात भारताच्या विमानचालकाचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर या विमानचालकाला श्रद्धांजली देण्यासाठी हा एअरशो थांबविण्यात येईल, अशी आमची अपेक्षा होती. तथापि, एकअशो पुढे तसाच चालू ठेवून त्याच्या आयोजकांनी अत्यंत असंवेदनशील वर्तन केले आहे. या वर्तनाच्या निषेधार्थ अमेरिकाही आपली विमाने या शोमधून मागे घेत असून आम्ही आता या शोमध्ये भाग घेणार नाही, असे टेलर हिस्टर यांनी सोमवारी स्पष्ट केले आहे.
या एअरशोमध्ये सहभागी झालेल्या एका चालकाचा शो चालू असताना अपघाती मृत्यू झाल्यानंतरही तो चालूच ठेवण्याचा निर्णय धक्कादायक आहे. हा अपघात घडल्यानंतर मी एअरशोच्या स्थानी गेलो होतो. एअरशो थांबविण्यात आला असेल आणि हे स्थान रिक्त झाले असेल, अशी माझी अपेक्षा होती. तथापि, शो पुढे चालू ठेवण्याचा निर्णय मला समजल्यानंतर मला मोठा धक्का बसला. हा निर्णय असंवेदनशील आहे. त्यामुळे अमेरिकेच्या विमानांनीही आता या शोमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आणखी काही देशांनीही असा निर्णय घेतला आहे, असे हिस्टर यांनी स्पष्ट केले. हिस्टर हे या एकअशोमध्ये भाग घेतलेल्या अमेरिकेच्या एफ-16 विमान पथकाचे प्रमुख कमांडर आहेत.
तुमचे असे झाले असते तर...
एक विमान पडले म्हणून काय झाले ? एअरशो चालूच राहिला पाहिजे, असा निर्णय घेण्यात आला. ‘शो मस्ट गो ऑन’ अशी म्हणही आहे. तथापि, तुमच्या विमानाचे असे काही झाले, तर हीच म्हण तुम्हाला ऐकविली जाईल. त्यावेळी तुम्हाला असे वाटेल, त्याचा विचार करा, अशा भावनात्मक शब्दांमध्ये हिस्टर यांनी सोशल मिडियावर त्यांचे विचार व्यक्त केले असून श्रद्धांजली दिली आहे.
स्याल यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
शनिवारी दुबईतील एअरशो अपघातात मृत झालेले भारताच्या तेजस विमानाचे विंग कमांडर नामांश स्याल यांच्या पार्थिवावर हिमाचल प्रदेशातील पाटियालकार ग्रामी सरकारी सन्मानात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पार्थिव प्रथम तामिळनाडूतील सुरुर येथील भारतीय वायूदलाच्या तळावर आणण्यात आले. तेथे त्यांच्या पार्थिवाला शासकीय सन्मानात मानवंदना देण्यात आली. नंतर ते त्यांच्या मूळ गावी नेण्यात आले, अशी माहिती भारतीय वायूदलाकडून देण्यात आली आहे.
अपघाताचा नाही विपरीत परिणाम
तेजस या युद्धविमानाची निर्मिती ‘हिंदुस्थान एअरोनॉटिक्स’च्या उत्पादन केंद्रांमध्ये केली जात आहे. ही विमाने अत्याधुनिक असून ती निर्यात करण्याचाही भारताचा विचार आहे. तथापि, दुबई येथील अपघातानंतर विमानांच्या गुणवत्तेविषयी प्रश्न उपस्थित होणार का, अशी चर्चा होत आहे. मात्र, हा अपघात ही अपवादात्मक घटना असून विमानाच्या उत्पादनावर किंवा निर्यातीच्या शक्यतेवरही कोणत्याही विपरीत परिणाम होणार नाही, अशी प्रतिक्रिया ‘हिंदुस्थान एअरोनॉटिक्स’ या कंपनीकडून सोमवारी व्यक्त करण्यात आली आहे.