For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युएनमध्ये पॅलेस्टाइनच्या सदस्यत्वावर अमेरिकेचा नकाराधिकार

06:17 AM Apr 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
युएनमध्ये पॅलेस्टाइनच्या सदस्यत्वावर अमेरिकेचा नकाराधिकार
Advertisement

सुरक्षा परिषदेत 12 देशांच्या समर्थनानंतरही प्रस्ताव फेटाळला :

Advertisement

संयुक्त राष्ट्रसंघ

संयुक्त राष्ट्रसंघात पॅलेस्टाइनला पूर्ण सदस्यत्व देण्याच्या प्रस्तावावर अमेरिकेने नकाराधिकार वापरला आहे. संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेत अल्जीरियाने हा प्रस्ताव मांडला होता. अमेरिकेने नकाराधिकार वापरल्याने पॅलेस्टाइनला संयुक्त राष्ट्रसंघाचा स्थायी सदस्य होता आले नाही.

Advertisement

सुरक्षा परिषदेत कुठलाही प्रस्ताव संमत करण्यासाठी कमीतकमी 9 सदस्यांच्या समर्थनाची गरज होती. 15 सदस्यीय सुरक्षा परिषदेत पॅलेस्टाइनच्या बाजूने 12 मते पडली. तर ब्रिटन आणि स्वीत्झर्लंडने मतदानापासून अंतर राखले. गाझामध्ये झालेल्या विध्वंसानंतर अमेरिका या प्रस्तावावर नकाराधिकार वापरणार नसल्याचे मानले जात होते. परंतु अमेरिकेने नकाराधिकाराचा वापर केला आहे.

संयुक्त राष्ट्रसंघात स्थायी सदस्यत्व प्राप्त करण्याचा पॅलेस्टाइनचा हा दुसरा प्रयत्न होता. यापूर्वी 2011 मध्ये देखील पॅलेस्टाइनला स्थायी सदस्यत्व देण्यावरून सुरक्षा परिषदेत मतदान झाले होते. परंतु त्यावेळीही अमेरिकेने प्रस्तावावर नकाराधिकार वापरला होता.

अमेरिकेकडून स्पष्टीकरण

पॅलेस्टाइनच्या स्थायी सदस्यत्वाच्या प्रस्तावावर नकाराधिकाराप्रकरणी अमेरिकेने स्पष्टीकरण दिले आहे. अमेरिका देखील द्विराष्ट्राचा तोडगा इच्छितो, परंतु संयुक्त राष्ट्रसंघाचे पूर्ण सदस्यत्व आताच देता येणार नाही. पॅलेस्टाइनला स्वतंत्र देशाचा दर्जा देण्याची योग्य पद्धत इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यात थेट चर्चा आहे. या चर्चेत अमेरिका आणि अन्य सहकारी देश मदत करतील. दोन्ही गटांमध्ये थेट चर्चेद्वारे तोडगा निघावा अशी आमची इच्छा असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेचे प्रतिनिधी रॉबर्ट वूड यांनी म्हटले आहे.

हार मानणार नाही : पॅलेस्टाइन

अमेरिकेकडून नकाराधिकार वापरण्यात आल्याने इस्रायलने त्याचे कौतुक केले आहे. एक लज्जास्पद प्रस्ताव नाकारला गेला, दहशतवादाला पुरस्कृत केले जाऊ नये असे इस्रायलचे विदेशमंत्री काट्स यांनी म्हटले आहे. तर पॅलेस्टाइन अथॉरिटीचे अध्यक्ष महमूद अब्बास यांनी अमेरिकेच्या नकाराधिकाराची निंदा केली आहे. अब्बास यांनी याला चुकीचे आणि अनैतिक ठरविले आहे. प्रस्ताव संमत न झाल्याने आमचा निर्धार कमकुवत होणार नाही. आम्ही हार न मानता पॅलेस्टाइनला सदस्यत्व मिळवून देण्याचा प्रयत्न करत राहू असे संयुक्त राष्ट्रसंघातील पॅलेस्टाइनचे राजदूत रियाद मंसूर यांनी म्हटले आहे.

पॅलेस्टाइन युएनचा बिगरसदस्यीय देश

पॅलेस्टाइनला जगातील 140 पेक्षा अधिक देशांनी मान्यता दिली आहे. परंतु संयुक्त राष्ट्रसंघात पॅलेस्टाइन अद्याप स्थायी सदस्य झालेला नाही. तर इस्रायलला 1947 मध्येच संयुक्त राष्ट्रसंघाचे स्थायी सदस्यत्व मिळाले होते. सध्या पॅलेस्टाइन युएनमध्ये बिगर सदस्यीय देश आहे. अशाप्रकारच्या देशांना संयुक्त राष्ट्रसंघात स्वत:ची बाजू मांडता येते, परंतु मतदानाचा अधिकार नसतो. पॅलेस्टाइनसोबत व्हॅटिकन सिटी देखील बिगर सदस्यीय देश आहे.

Advertisement
Tags :

.