अमेरिकेतील ‘शटडाऊन’ला 43 दिवसांनी पूर्णविराम
इतिहासातील सर्वात मोठा ‘शटडाऊन’ : आता सरकारी कामकाज सुरळीत होण्याचा मार्ग सुकर
वृत्तसंस्था/वॉशिंग्टन डीसी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी सरकारी निधी विधेयकावर स्वाक्षरी केल्यामुळे 43 दिवसांचा शटडाऊन संपुष्टात आला आहे. अमेरिकन सिनेटरनी शटडाऊन संपविण्यासंबंधीचे विधेयक मंजूर केले आहे. व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी या विधेयकावर स्वाक्षरी केली. ट्रम्प यांच्या स्वाक्षरीनंतर अमेरिकेतील शटडाऊनला पूर्णविराम मिळाला असून आता सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मागील जवळपास दीड महिन्यापासून हे विधेयक मंजूर न झाल्यामुळे सरकारी सेवांवर बराच परिणाम झाला होता.
अमेरिकन प्रतिनिधी सभागृहात बुधवारी शटडाऊन संपवण्याचे विधेयक मंजूर झाल्यानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. तसेच अनेक खासदारांनी आनंदाने एकमेकांना आलिंगन दिले. यापूर्वी मतदानादरम्यान काही खासदारांनी सभागृहातून वॉकआउट केले. हे विधेयक सभागृहात 222 विरुद्ध 209 मतांनी मंजूर झाले. विधेयक मंजूर होताच ट्रम्प यांनी लवकरच या विधेयकावर स्वाक्षरी करणार असल्याची घोषणा केली.
‘शटडाऊन’ संपविण्यासाठीचे विधेयक प्रतिनिधी सभागृहात 222-209 मतांनी मंजूर झाले. तथापि, आरोग्य सेवा कार्यक्रमाच्या एसीए सबसिडीजसाठी (ओबामाकेअर) प्रीमियम कर क्रेडिट्स वाढविण्याचे कोणतेही आश्वासन दिलेले नाही. याची मुदत 31 डिसेंबर 2025 रोजी संपत आहे. सदर विधेयक यापूर्वीच सिनेटमध्ये मंजूर झाले आहे. दरम्यान, काही डेमोक्रॅटिक नेत्यांनी एसीए सबसिडीसाठी कर क्रेडिट्स वाढवण्यासाठी लढा सुरू ठेवणार असल्याचे जाहीर केले आहे. ‘ही लढाई अजून संपलेली नाही; आम्ही लढत राहू.’ असे डेमोक्रॅट्सनी जाहीर केल्याने ट्रम्प यांची डोकेदुखी कायम आहे.
सभागृहाने बुधवारी रात्री निधी विधेयक मंजूर केल्यानंतर डेमोक्रॅटिक नेते हकीम जेफ्रीज, व्हीप कॅथरीन क्लार्क आणि कॉकसचे अध्यक्ष पीट अगुइलर यांनी संयुक्त निवेदन जारी केले. ओबामाकेअर क्रेडिट्स तीन वर्षांसाठी वाढवण्यासाठी आपला लढा सुरू राहील असे त्यांनी म्हटले आहे. या सुविधेमुळे गरीब आणि मध्यमवर्गीय अमेरिकन लोकांसाठी आरोग्य विमा परवडणार असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच त्यांनी रिपब्लिकन नेत्यांना आरोग्य धोरणांवर एकत्र काम करण्याचे आवाहन केले.