अमेरिकेचा नौकेवर हल्ला, ट्रम्प, हेगसेथ अडचणीत
अमेरिकेच्या दिशेने न येणाऱ्या नौकेवर हल्ला
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
व्हेनेझुएलातून अमेरिकेत होणाऱ्या अमली पदार्थ तस्करीच्या विरोधात मोहीम राबविणारे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका बसला आहे. 2 सप्टेंबर रोजी एका नौकेवर अमेरिकेच्या नौदलाने हल्ला केला होता. या नौकेवर अमली पदार्थ होते आणि ही नौका अमेरिकेच्या दिशेने येत होती असा दावा अमेरिकेच्या प्रशासनाने केला होता. परंतु आता नव्या अहवालानुसार ही नौका अमेरिकेच्या दिशेने येत नव्हती असे स्पष्ट झाले आहे.
ही नौका एका मोठ्या जहाजाच्या दिशेने जात होती. हे जहाज दक्षिण अमेरिकन देश सूरिनामच्या दिशेने प्रवास करत होते अशी माहिती मोहिमेची धुरा सांभाळणाऱ्या अॅडमिरलने सिनेटर्सना दिली आहे. अमेरिकेच्या नौदलाकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात नौकेतून प्रवास करणारे 11 जण मृत्युमुखी पडले होते.
ट्रम्प यांनी या स्ट्राइकचा व्हिडिओ शेअर करत व्हेनेझुएलावरील दबाव वाढविला होता. व्हेनेझुएलातून नार्को टेररिस्टर आंतरराष्ट्रीय जलक्षेत्राच्या माध्यमातून अमेरिकेत अमली पदार्थ आणू पाहत होते. हे हिंसक ड्रग तस्कर कार्टेल अमेरिकेची राष्ट्रीय सुरक्षा, विदेश धोरण आणि महत्त्वपूर्ण हितसंबंधांसाठी धोकादायक असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता.
तर संबंधित नौका दुसऱ्या जहाजाच्या दिशेने जात होती, परंतु नौदलाला तेव्हा याची कल्पना आली नाही. परंतु नौका सूरीनाम येथून अमेरिकेच्या दिशेने येऊ शकत होती. पण सर्वसाधारणपणे सूरीनाम येथून तस्करी होणारे अमली पदार्थ युरोपच्या दिशेने नेले जात असतात असे अॅडमिरलने अमेरिकेच्या खासदारांसमोर सांगितले आहे.
ट्रम्प, हेगसेथ यांच्यावर दबाव
हा अहवाल समोर आल्यावर युद्धमंत्री पीट हेगसेथ यांची भूमिका चौकशीच्या कक्षेत आली आहे. कारण त्यांनीच या नौकेवर हल्ला करण्याचा आदेश दिला होता. मिशनचे लक्ष्य सर्व 11 जणांना ठार करणे आणि नौकेला बुडविणे होते असे अॅडमिरलने खासदारांना सागितले आहे. यामुळे हेगसेथ यांच्यावर आता पूर्ण व्हिडिओ फूटेज जारी करण्यासाठी मोठा दबाव आहे. हेगसेथ सध्या सिग्नल चॅटच्या माध्यमातून अमेरिकन सैनिकांच्या लोकेशनला हुती बंडखोरांसमोर उघड करण्याच्या आरोपालाही तोंड देत आहेत.