व्हेनेझुएला अध्यक्षांचे विमान अमेरिकेकडून जप्त
वृत्तसंस्था/ .वॉशिंग्टन
अमेरिकेने व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांचे आलिशान विमान जप्त केले आहे. हे विमान बनावट पद्धतीने खरेदी करण्यात आले होते आणि तस्करीद्वारे अमेरिकेबाहेर नेण्यात आले होते असा आरोप आहे. मादुरो यांचे आलिशान जेट डसॉल्ट फाल्कन 900ईएक्स हे डॉमिनिकन प्रजासत्ताक येथे जप्त करण्यात आले आहे. डॉमिनिकन प्रजासत्ताक हा कॅरेबियन क्षेत्रातील दक्षिण अमेरिकन देश आहे. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी हे विमान अमेरिकेत आणले आहे.
डसॉल्ट फाल्कन 900ईएक्सची किंमत 110 कोटी रुपये इतकी आहे. 2023 च्या प्रारंभी मादुरो यांच्याशी संबंधित लोकांनी स्वत:ची ओळख लपवत हे आलिशान विमान खरेदी केले होते. याकरता त्यांनी एक कॅरेबियन शेल कंपनीचा वापर केला होता. एप्रिल 2023 मध्ये त्यांनी हे विमान अवैध पद्धतीने ताब्यात घेतले होते. अमेरिकेकडून व्हेनेझुएलावर आर्थिक निर्बंध लादले आहेत. मादुरो यांचे विमान सॅन मॅरिनोमध्ये नोंदणीकृत होते. व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांनी या विमानाचा वापर अनेक विदेश दौऱ्यांकरता केला होता.
संबंधित विमान खरेदी करण्यासाठी सेंट विसेंट अँड ग्रेनेडाइन्स देशाचा पत्ता सांगण्यात आला होता. नंतर हे विमान सॅन मॅरिनोमध्ये नोंदणीकृत करत व्हेनेझुएलात पाठविण्यात आले होते. अमेरिकेला या गैरप्रकाराची माहिती कळल्यावर जानेवारी 2023 मध्ये विमानाची नोंदणी रद्द करण्यात आली होती. यंदा मार्च महिन्यात हे विमान डॉमिनिकन रिपब्लिक येथे पोहोचले होते.
दरोड्यासारखा प्रकार : व्हेनेझुएला
व्हेनेझुएलाच्या सरकारने विमान जप्त झाल्याची कबुली दिली आहे. अमेरिकेच्या सरकारची ही कृती दरोड्यासारखीच असल्याचे व्हेनेझुएलाने म्हटले आहे. अमेरिकेने पुन्हा एकदा गुन्हा केला आहे. अध्यक्षांकडून वापरले जाणारे विमान अमेरिकेने जप्त केले असल्याचे व्हेनेझुएला सरकारकडून म्हटले गेले.
अमेरिकेकडून निर्बंध
व्हेनेझुएला आणि अमेरिकेदरम्यान अनेक दशकांपासून मतभेद आहेत. व्हेनेझुएला हा अमेरिकेच्या भांडवलशाही आणि विदेश धोरणांवर टीका करतो, तर अमेरिकेकडून व्हेनेझुएलातील मानवाधिकारांच्या उल्लंघनांवर नाराजी व्यक्त केली जाते. व्हेनेझुएला हा कच्च्या तेलाचे सर्वाधिक साठे असलेला देश आहे. परंतु अमेरिकेच्या निर्बंधांमुळे हा देश आर्थिक संकटात सापडला आहे.