For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा जिवंतच

06:58 AM Sep 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा जिवंतच
Advertisement

अफगाणिस्तानमध्ये अल कायदाची कमान सांभाळण्यात सक्रिय : पाश्चात्य देशांवर हल्ले करण्यासाठी सज्ज

Advertisement

वृत्तसंस्था / लंडन, काबूल

अल कायदाचा माजी म्होरक्मया ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा बिन लादेनबाबत नवे खुलासे समोर आले आहेत. 2019 मध्ये अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात हमजा मारला गेल्याचा दावा करण्यात आला होता, परंतु आता गुप्तचर अहवालातून तो जिवंत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सद्यस्थितीत त्याने अल कायदाचा ताबा घेतला असून आता तो पश्चिमेकडील देशांमध्ये नव्या हल्ल्यांची योजना आखत असल्याचेही उघड झाले आहे.

Advertisement

दहशतवादाचा क्राऊन प्रिन्स म्हणून कुख्यात असलेला बिन लादेन परिवार आता पुन्हा अल कायदासोबत एकत्र येत आहे. त्याच्या देखरेखीखाली अफगाणिस्तानात दहशतवाद्यांसाठी नवीन प्रशिक्षण शिबिरे स्थापन करण्यात आली आहेत. अल कायदा ब्रिटन आणि अमेरिकेसह पाश्चात्य देशांवर हल्ले करण्याची योजना आखत आहे. त्यासाठी तो दहशतवादी लढवय्यांना पुन्हा प्रशिक्षण देत आहे. हमजाच्या नेतृत्वामुळे दहशतवादी गट बळकट झाल्याचा इशारा तज्ञांनी दिला आहे. इतकेच नाही तर हमजाच्या उपस्थितीमुळे अल कायदाचे तालिबानशी संबंध आणखी घट्ट होत आहेत. हमजाचा भाऊ अब्दुल्ला बिन लादेन हाही अल कायदाच्या कारवायांमध्ये सहभागी असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

इराणमध्ये आश्र्रय

सीआयएपासून वाचण्यासाठी हमजा बिन लादेन आणि त्याच्या चार पत्नींनी अनेक वर्षे इराणमध्ये आश्र्रय घेतल्याचे मानले जाते. अफगाणिस्तानमध्ये 2019 च्या अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु यासाठी कोणताही डीएनए पुरावा गोळा केला गेला नाही. नवीनतम गुप्तचर हवाल्यानुसार, अल कायदा इराणमधील सदस्यांच्या हालचाली सुलभ करण्यासाठी अफगाण प्रांतांमध्ये सुरक्षित घरांचा वापर करत असल्याचे उघड झाले आहे.

पाश्चिमात्य देश भीतीच्या छायेत

साहजिकच पाश्चिमात्य देशांमध्ये दहशतवादी कारवायांची नवी लाट येण्याची भीती वाढली आहे. 2011 मध्ये ओसामा बिन लादेनचा मृत्यू झाल्यानंतर आणि 2022 च्या यूएस ड्रोन हल्ल्यात ओसामाचा उत्तराधिकारी अल-जवाहिरी मारला गेल्यानंतर बरीच शांतता होती. मात्र तालिबानच्या सत्तेतील पुनरागमनाचा फायदा घेत अल कायदा पुन्हा अफगाणिस्तानात स्वत:ला मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. याचे धोकादायक परिणाम होऊ शकतात.

तालिबानने अमेरिकेसोबतच्या करारात दहशतवादी गटांशी संबंध तोडण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अल कायदाला देशात प्रस्थापित करत दहशतवादाशी आपले संबंध संपणार नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे सुरक्षेची परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली आहे. सद्यस्थितीत अफगाणिस्तानमध्ये 21 हून अधिक विविध दहशतवादी नेटवर्क सक्रिय आहेत. विशेष म्हणजे ज्या भागात पूर्वी पाश्चात्य सैन्याने लढा दिला आहे त्या भागात अल कायदाची प्रशिक्षण शिबिरे उभारली आहेत. या तळांचे बस्तान हे अल कायदाच्या वाढत्या ताकदीचा पुरावा आहे. त्यामुळे 9/11 सारखा दुसरा हल्ला होण्याची भीती निर्माण झाली आहे.

Advertisement
Tags :

.