For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिकेत आज अध्यक्षीय निवडणूक

06:14 AM Nov 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकेत आज अध्यक्षीय निवडणूक
Advertisement

कमला हॅरिस अन् डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चुरशीची लढत : मतदान पूर्ण झाल्यावर निकाल येण्यास सुरुवात

Advertisement

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी डेमोक्रेटिक पार्टीच्या उमेदवार कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अत्यंत चुरशीची स्थिती आहे. ही निवडणूक ऐतिहासिक स्वरुपात अत्यंत चुरशीची ठरणार असल्याचे मतदानपूर्व सर्वेक्षणामध्ये म्हटले गेले आहे. अमेरिकेतील या निवडणुकीत इमिग्रेशन हा एक प्रमुख मुद्दा असून यावरून दोन्ही उमेदवार भारतीयांना स्वत:च्या बाजूने वळवू पाहत आहेत. न्यूयॉर्क टाइम्स/सिएना कॉलेज पोलनुसार 7 प्रांतांमध्ये हॅरिस आणि ट्रम्प यांच्यात चढाओढ दिसून येत आहे. मंगळवारी अध्यक्षपदासाठी होणाऱ्या मतदानापूर्वी दोन्ही पक्षांनी स्वत:ची पूर्ण शक्ती झोकून देत प्रचार केला आहे.

Advertisement

सर्वेक्षणानुसार हॅरिस यांना नेवादा, उत्तर कॅरोलिना आणि विस्कॉन्सिन या प्रांतांमध्ये किंचित आघाडी मिळण्याची शक्यता आहे, तर ट्रम्प हे अॅरिझोनामध्ये वरचढ ठरू शकतात. मिशिगन, जॉर्जिया आणि पेन्सिल्वेनिया या प्रांतात खरी चुरस दिसून येत आहे. तर डेस मोइनेस रजिस्टर/मीडियाकामच्या सर्वेक्षणानुसार हॅरिस या आयोवा प्रांतात ट्रम्प यांच्यावर आघाडी घेऊ शकतात. आयोवा प्रांतात ट्रम्प यांनी 2016 आणि 2020 मध्ये सहजपणे विजय मिळविला होत. परंतु आता महिला मतदारांमुळे येथील चित्र बदलत असल्याचे मानले जात आहे.

7.6 कोटी अमेरिकनांचे यापूर्वीच मतदान

अमेरिकेत अर्ली वोटिंगच्या सुविधेच्या अंतर्गत कोट्यावधी लोकांनी मतदान केले आहे. 7.6 कोटीहून अधिक नागरिकांनी पूर्वीच मतदान केले आहे. अमेरिकेत सुमारे 18.65 कोटी मतदार आहेत. हे मतदार मेल-इन मतपत्रिकांच्या माध्यमातून किंवा वैयक्तिक स्वरुपात मतदान केंद्रांवर पोहोचून अर्ली वोटिंगचा लाभ घेत आहेत. यामुळे मतदारांना खराब हवामान, लांब रांगा किंवा मतदानाच्या दिवशी टाइम मॅनेजमेंटपासून वाचण्यास मदत होते.

निकालाला लागू शकतो वेळ

सर्वकाही सुरळीत राहिल्यास आणि प्रमुख प्रांतामंध्ये विजयाचे अंतर अधिक राहिले तर निकाल मध्यरात्रीपर्यंत लागू शकतो. परंतु हॅरिस आणि ट्रम्प यांच्यात अत्यंत चुरशीची लढत होणार असल्याने निकालाला विलंब होऊ शकतो. स्विंग स्टेट्समध्ये दोन्हीपैकी एक उमेदवार महत्त्वपूर्ण विजय मिळवत नाही तोवर अमेरिकेचा अध्यक्ष कोण होणार हे लोकांना समजणार नाही. पारंपरिक स्वरुपात पराभूत होणारा उमेदवार निकाल स्पष्ट झाल्यावर अधिकृत घोषणेपूर्वीच पराभव मान्य करतो. परंतु 2020 मध्ये ट्रम्प यांनी स्वत:चा पराभव मान्य केला नव्हता. ट्रम्प हे पराभूत झाल्यास ते कायदेशीर मार्ग अवलंबून निकालाला आव्हान देऊ शकतात.

निवडणुकीचे स्वरुप

अमेरिकेत निवडणुकीचे अनेक टप्पे असतात. यात प्रायमरी, नॅशनल कन्व्हेंशन, सार्वत्रिक निवडणूक, इलेक्टोरल कॉलेज यांचा समावेश असतो. पहिला टप्पा डेलिगेट्स निवडण्यासाठी असतो. हे राजकीय पक्षांच्या प्रायमरी आणि कॉकसद्वारे निवडले जातात. नॅशनल कन्व्हेंशनमध्ये रिपब्लिकन आणि डेमोक्रेटिक पार्टीकडून निवडण्यात आलेल्या उमेदवारांदरम्यान चर्चा होते. पुढील प्रक्रिया इलेक्टर्स निवडण्याची असते. लोकसंख्येनुसार प्रांतातील मतदार इलेक्टर्स निवडून पाठवत असतात. हा अध्यक्षीय निवडणुकीचा महत्त्वाचा टप्पा असतो. पूर्ण देशातून 538 इलेक्टर्स निवडले जातात. निवडणूक जिंकणाऱ्या पक्षाला कमीत कमी 270 इलेक्टर्सच्या पाठिंब्याची गरज भासते. अध्यक्षाची निवड ही प्रांतांच्या लोकसंख्येनुसार वितरित 538 सदस्यांच्या इलेक्टोरल कॉलेजद्वारे केली जाते. याचमुळे उमेदवाराला मते अधिक मिळूनही तो पराभूत होऊ शकतो.

कधी घेणार अध्यक्षपदाची शपथ

अमेरिकेत निवडणुकीत विजयी झालेला उमेदवार हा अध्यक्षपदाची शपथ जानेवारी महिन्यात वॉशिंग्टन डीसीमध्ये आयोजित एका सोहळ्यात घेत असतो. 20 जानेवारी 2025 रोजी अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा शपथविधी सोहळा होणार आहे.

Advertisement
Tags :

.