अमेरिकेच्या गुप्तचर प्रमुख गबार्ड भारतात येणार
हिंद-प्रशांत दौऱ्यावर रवाना : जपान, थायलंडला देणार भेट
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजेन्स डायरेक्टर म्हणजेच गुप्तचर प्रमुख तुलसी गबार्ड भारत दौऱ्यावर येणार आहेत. हिंद-प्रशांत देशांच्या दौऱ्यावर त्या रवाना झाल्या आहेत. यादरम्यान त्या जपान, थायलंड आणि भारताचा दौरा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फेब्रुवारीमधील अमेरिका दौऱ्यानंतर गबार्ड भारतात येणार आहेत. मोदींच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान गबार्ड यांनी त्यांची भेट घेत चर्चा केली होती.
गबार्ड यांनी स्वत:च्या दौऱ्याची सुरुवात प्रशांत महासागरातील अमेरिकन बेटन हवाईची राजधानी होनोलुलूमधून केली आहे. गुप्तचर संस्थांचे सदस्य, इंडो-पॅसिफिक कमांडचे अधिकारी आणि प्रशिक्षण घेत असलेल्या सैनिकांना त्या भेटणार आहेत.
43 वर्षीय तुलसी गबार्ड यांनी इराकच्या युद्धात अमेरिकेच्या सैन्याच्या वतीने भाग घेतला होता. आफ्रिका आणि मध्यपूर्वेतील युद्धक्षेत्रांमध्ये त्यांना तीनवेळा तैनात करण्यात आले होते. तुलसी गबार्ड या पूर्वी डेमोक्रेटिक पार्टीशी संबंधित होत्या. परंतु ऑक्टोबर 2022 मध्ये त्यांनी पक्षाला रामराम ठोकला होता आणि 2024 मध्ये त्यांनी रिपब्लिकन पार्टीत प्रवेश केला होता.
तुलसी गबार्ड या अमेरिकन काँग्रेस म्हणजेच संसदेतील पहिल्या हिंदू धर्मीय सदस्य होत्या, परंतु त्यांचा भारताशी थेट संबंध नाही. अमेरिकेतील भारताचे समर्थन करणाऱ्या नेत्यांमध्ये त्यांची गणना केली जाते. तसेच पाकिस्तानच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्यासाठी त्या ओळखल्या जातात.