अमेरिकेकडून चीनवर आणखी 100 टक्के कर
डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा : 1 नोव्हेंबरपासून
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर अतिरिक्त 100 टक्के व्यापार कर जाहीर केला आहे. ट्रुथ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये त्यांनी यासंबंधीची घोषणा केली. हा कर चीनवर सध्या लागू असलेल्या इतर कोणत्याही कराव्यतिरिक्त असेल. म्हणजेच यापूर्वी चीनवर 30 टक्के कर असल्यामुळे आता एकूण व्यापार शुल्क 130 टक्के झाले आहे. याची अंमलबजावणी 1 नोव्हेंबरपासून लागू होणार असल्याचेही अमेरिकेने जाहीर केले आहे.
अमेरिकेने अद्याप व्यापार शुल्कासंबंधीचा पिच्छा सोडलेला दिसत नाही. बड्या देशांवर अधिक कर लावून आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न चालवला जात आहे. याचा फटका अमेरिकन लोकांनाही बसत आहे. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व महत्त्वाच्या सॉफ्टवेअर निर्यातीवर बंदी घालण्याचे संकेत दिले आहेत. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमधील व्यापार युद्ध वाढले आहे. ट्रम्प यांनी सॉफ्टवेअर निर्यातीवर करवाढ आणि नियंत्रणाची घोषणा करताना चीनने दुर्मीळ पृथ्वी खनिजांवर निर्यात मर्यादा लादण्याच्या निर्णयाला प्रतिसाद म्हणून केली आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, ट्रुथ सोशलवरील पोस्टमध्ये चीनवर टीका केली आहे. दुर्मीळ पृथ्वी उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात निर्यात नियंत्रण लादण्याचा चीनचा निर्णय अपवादाशिवाय सर्व देशांवर परिणाम करतो, असे म्हटले आहे.