युरोपियन युनियनवर अमेरिकेचा 30 टक्के कर
मेक्सिकोलाही तितकाच कर : व्यापार युद्ध आणखी तीव्र होण्याची शक्यता : 1 ऑगस्टपासून अंमलबजावणी
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी मेक्सिको आणि युरोपियन युनियनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर 30 टक्के कर लादण्याची घोषणा केली. याची अंमलबजावणी 1 ऑगस्टपासून होणार आहे. मागील अनेक आठवडे सुरू असलेल्या व्यापार चर्चेनंतरही कोणताही करार अंतिम होऊ न शकल्याने ट्रम्प यांनी ही घोषणा केली. ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून मेक्सिको आणि युरोपियन युनियनला लिहिलेले पत्र शेअर केले आहे.
ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे व्यापार युद्ध आणखी तीव्र होण्याची शक्यता वाढली आहे. युरोपियन युनियन अजूनही अमेरिकेसोबत व्यापक व्यापार करारावर काम करत आहे. 27 सदस्यीय युरोपियन युनियनला आता अमेरिकन बाजारपेठेत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला जपान, दक्षिण कोरिया, कॅनडा आणि ब्राझीलमधून येणाऱ्या वस्तूंवर कर वाढवल्यानंतर ट्रम्प यांची ही घोषणा आली आहे.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या कर धोरणाचे वर्णन अमेरिकन उद्योगांचे संरक्षण करणे आणि देशांतर्गत महसूल वाढवणे असे केले आहे. युरोपियन युनियनने सुरुवातीला अमेरिकेसोबत औद्योगिक वस्तूंवर शून्य-कर आकारणी व्यापार करार करण्याची मागणी केली होती. तथापि, अनेक महिन्यांच्या तणावपूर्ण वाटाघाटींनंतरही कोणताही करार होऊ शकला नाही. जर्मनीने आपल्या औद्योगिक क्षेत्राचे संरक्षण करण्यासाठी जलद कराराचा आग्रह धरला आहे, तर फ्रान्ससारख्या देशांनी अमेरिकेच्या प्रस्तावाला विरोध केला असला तरी तो त्यांना एकतर्फी वाटतो.