अमेरिकेने भारताला सोपविले दुसरे जीई-404 इंजिन
तेजस एलसीए मार्क-1एमध्ये वापरले जाणार : डिसेंबरपर्यंत 12 इंजिन भारतात पोहोचणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिकेने भारताला दुसरे जीई-404 इंजिन सोपविले आहे. हे इंजिन तेजस लढाऊ विमानात (एलसीए मार्क 1ए) बसविले जाणार आहे. अमेरिकन कंपनीने हे इंजिन तेजस लढाऊ विमानाची निर्मिती करणारी सरकारी कंपनी हिंदुस्थान एअरोनॉक्टिस लिमिटेडकडे (एचएएल) सोपविले आहे. एचएएलला चालू वर्षाच्या अखेरयर्पंत अशाप्रकारची 12 इंजिन्स मिळणार आहेत. या सर्व इंजिन्सचा वापर एलसीए मार्क 1ए लढाऊ विमानांमध्ये केला जाणार आहे.
भारतीय वायुलाने तेजस मार्क 1ए प्रकारातील 83 विमानांची ऑर्डर दिली आहे. ही विमाने 2028 पर्यंत वायुदलाला प्राप्त होणार आहेत. तर आणखी 97 विमानांच्या खरेदीचा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाकडून मंजुरी मिळाल्यावर आता अंतिम टप्प्यात आहे.
अमेरिकेच्या जीई एअरोस्पेस या कंपनीने एचएएलला एलसीए मार्क 1 एसाठी 99 एफ404-आयएन20 इंजिन्सपैकी पहिले इंजिन चालू वर्षाच्या प्रारंभी सोपविले होते. एचएएल आता या इंजिन्सना मार्क 1 ए लढाऊ विमानात इंटीग्रेट करणे आणि वायुदलाला 10 हून अधिक अशा विमानांचा पुरवठा करण्याचे नियोजन करत आहे. अलिकडेच कॅबिनेट सचिव पी.के. मिश्रा यांनी बेंगळूर येथील एचएलच्या प्रकलपाचा दौरा केला होता आणि एलसीए मार्क2 प्रकल्पासह मार्क 1 ए प्रकल्पाचा आढावा घेतला होता.
2035 चे बाळगण्यात आले लक्ष्य
2035 पर्यंत मिराज 2000, जग्वार आणि मिग-29 यासारख्या जुन्या लढाऊ विमानांची जागा घेण्यासाठी एलसीए मार्क 2 प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. पुढील 10 वर्षांमध्ये भारत 400 हून अधिक स्वदेशी एलसीए विमाने निर्माण करणार असून त्यात अमेरिकन जीई इंजिन वेरिएंट्सचा वापर होणार आहे. एलसीए मार्क 2 च्या विकासासाठी 9 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक मंजूर करण्यात आला आहे. हे एलसीए तेजसचे अद्ययावत आणि अधिक शक्तिशाली वर्जन असणार आहे.
एचएएलला मिळाली जबाबदारी
एचएएलला 2021 मध्ये भारतीय वायुदलासाठी 83 तेजस मार्क-1ए निर्माण करण्याकरता 46,898 कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले होते. कंपनीला 2028 पर्यंत 83 लढाऊ विमानांचा पुरवठा करावा लागणार आहे. भारतीय वायुदल तेजसच्या एलसीए वेरिएंटद्वारे स्वत:च्या ताफ्यातील वर्तमान मिग सीरिजच्या विमानांना बदलण्याच्या तयारीत आहे. एलसीए मार्क-1ए मध्ये वापरण्यात आलेल्या 65 टक्क्यांपेक्षा अधिक उपकरणांना भारतात निर्माण करण्यात आले आहे. एलसीए मार्क-1ए हे एअरोस्पेसमध्ये भारताचे आत्मनिर्भरता आणि मेक-इन-इंडियाच्या दिशेने मोठे पाऊल असल्याचे मानले जात आहे. स्वदेशी तेजस मार्क-1ए पाकिस्तान सीमेनजीकच्या नाला वायुतळावर तैनात करण्याची योजना आहे.