अमेरिकेचे एफ-16 लढाऊ विमान दक्षिण कोरियात कोसळले
सुदैवाने वाचला वैमानिकाचा जीव
वृत्तसंस्था/ सोल
अमेरिकेचे एफ-16 लढाऊ विमान बुधवारी दक्षिण कोरियाच्या पश्चिम किनाऱ्यानजीक कोसळले आहे. विमान कोसळण्यापूर्वीच वैमानिक बाहेर पडल्याने त्याचा जीव वाचला आहे. सोलपासून सुमारे 180 किलोमीटर अंतरावरील कुनसन वायुतळावरून झेपावलेले हे लढाऊ विमान सकाळी 8.41 वाजण्याच्या सुमारास पिवळ्या समुद्रात कोसळले आहे.
दक्षिण कोरिया आणि अमेरिकेच्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नाने वैमानिकाला सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. वैमानिकाची प्रकृती स्थिर असून दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेण्यासाठी तपास केला जात असल्याचे अमेरिकेच्या वायुदलाकडून सांगण्यात आले आहे.
एका वर्षात तिसऱ्यांदा एफ-16 लढाऊ विमान दक्षिण कोरियात दुर्घटनाग्रस्त झाले आहे. डिसेंबर महिन्यात आठव्या फायटर विंगचे एफ-16 विमान पिवळ्या समुद्रात कोसळले होते. तर त्यापूर्वी मे महिन्यात अमेरिकेच्या 51 व्या फायटर विंगचे एफ-16 लढाऊ विमान प्योंगटेकच्या ओसान वायुतळावर दुर्घटनाग्रस्त झाले होते. परंतु या दोन्ही दुर्घटनांमध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नव्हती.