For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुख्यात दहशतवाद्याचा पाकिस्तानमध्ये मृत्यू

06:47 AM Dec 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
कुख्यात दहशतवाद्याचा पाकिस्तानमध्ये मृत्यू
Advertisement

वृत्तसंस्था / इस्लामाबाद

Advertisement

मुंबईत 2008 मध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा एक सूत्रधार आणि भारताला हवा असणारा दहशतवादी अब्दुल रहमान मक्की याचा पाकिस्तानात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. तो अनेक दिवसांपासून आजारी होता आणि त्याच्यावर लाहोर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार पेले जात होते.

मक्की हा बंदी घालण्यात आलेली दहशतवादी संघटना जमात उद् दावाचा उपप्रमुख होता. त्याच्यावर 20 लाख डॉलर्सचे इनाम होते. तो मूळचा पाकिस्तानचाच नागरीक होता. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचे सूत्रसंचालन पाकिस्तानात बसून करणाऱ्या दहशतवाद्यांपैकी तो एक होता. भारतासाठी तो मोस्ट वाँटेड होता. त्याच्या मृतदेहाचे दफन शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता करण्यात आले, अशी माहिती त्याच्या कुटुंबियांनी दिली आहे. त्याच्या मृत्यूमुळे भारताचा आाणखी एक शत्रू संपला आहे, अशी प्रतिक्रिया भारतात अनेकांनी व्यक्त केली आहे.

Advertisement

घोषित आंतरराष्ट्रीय दहशतवादी

अब्दुल रहमान मक्की याला संयुक्त राष्ट्रसंघाकडून आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले होते. 2020 मध्ये त्याला दहशतवादी कृत्यांना आर्थिक साहाय्य पुरविल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या दहशतवादी विरोधी दलाने अटक केली होती आणि त्यानंतर सहा महिने तो कारावासात होता. या काळात त्याने स्वत:ला प्रसिद्धीच्या झोतापासून अलिप्त ठेवले होते. आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित झाल्यापासून त्याने सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेणेही बंद केले होते. भारताने पाकिस्तानकडे अनेकदा त्याचा ताबा मागितला होता.

मुंबई हल्ल्याचा सूत्रधार

2008 मध्ये पाकिस्तानातून समुद्रमार्गे मुंबईत घुसलेल्या 10 दहशतवाद्यांनी अनेक ठिकाणांवर दहशतवादी हल्ले केले होते. जवळपास 3 दिवस मुंबईवर दहशतवाद्यांचेच राज्य होते, असे त्यावेळी बोलले जात होते. नंतर भारताने मुंबईत सेनेच्या तुकड्या पाठवून दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. कसाब हा दहशतवादी जिवंत पकडण्यात यश आले होते. त्यानंतर कसाबवर अभियोग चालवून त्याला फासावर लटकविण्यात आले होते. या हल्ल्याच्या चार पाकिस्तानी सूत्रधारांपैकी अब्दुल रहमान मक्की हा एक होता. त्यालाही आरोपी करण्यात आले होते.

Advertisement
Tags :

.