अमेरिकेकडून 6,000 विद्यार्थी व्हिसा रद्द
► वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
अमेरिकेच्या कायद्यांचा भंग करणे, तसेच अमेरिकेत व्हीसाचा कालावधी संपल्यानंतरही वास्तव्य करणे, आदी कारणांसाठी अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार विभागाने 6 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द केला आहे. यांपैकी अनेक विद्यार्थी गुन्हे आणि दहशतवाद यांच्याशी संबंधित आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. अमेरिकेच्या सुरक्षेला बाधक ठरणाऱ्यांचे व्हिसा रद्द करण्याचे अभियान डोनाल्ड ट्रंप अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यापासून हाती घेण्यात आले आहे.
या सहा हजारांहून अधिक विद्यार्थी व्हिसांपैकी 4 हजारांहून अधिक व्हिसे गुन्हेगारी कृत्यांसाठी रद्द करण्यात आले आहेत. हे व्हिसाधारक अमेरिकेत दरोडेखोरी, घरफोडी, हल्ला करणे आदी गुन्ह्यांमध्ये लिप्त असल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
दहशतवादाला समर्थन
विद्यार्थी व्हिसा घेऊन अमेरिकेत आलेले 300 हून अधिक लोक दहशतवादाला समर्थन करताना आढळले आहेत. दहशतवादी कृत्यांमध्ये त्यांचा स्वत:चा सहभाग आहे, किंवा ते अशा कृत्यांचे समर्थन करताना आढळले आहेत. अमेरिकेत दहशतवाद खपवून न घेण्याचे ट्रंप प्रशासनाचे धोरण असल्याने कठोर कारवाई करण्यात आली, अशी माहिती प्रसारित करण्यात आली आहे. व्हिसे रद्द झालेल्यांमध्ये भारतीय व्यक्तींचा समावेश आहे की नाही, या विषयी माहिती त्वरित उपलब्ध होऊ शकलेली नाही. मात्र, ही संख्या अत्यल्प असणे शक्य आहे.