अमेरिका-ब्रिटनकडून चौथ्यांदा येमेनवर हल्ला
हूती बंडखोरांच्या 18 ठिकाणांना केले लक्ष्य : आणखी 6 देशांनी दिली साथ
वृत्तसंस्था/ सना
अमेरिका आणि ब्रिटनने पुन्हा एकदा येमेनमध्ये हूती बंडखोरांच्या ठिकाणांवर हल्ले केले आहेत. हुतींच्या 18 ठिकाणांना यावेळी लक्ष्य करण्यात आले आहे. यात अंडरग्राउंड वेपन, क्षेपणास्त्र केंद्र आणि हवाई सुरक्षा यंत्रणा, हेलिकॉप्टर्स आणि रडार सिस्टीम नष्ट करण्यात आली आहे.
अमेरिका आणि ब्रिटनकडून हूतींवर चौथ्यांदा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात ऑस्ट्रेलिया, बहारीन, कॅनडा, डेन्मार्क, नेदरलँड्स आणि न्यूझीलंडने या दोन्ही देशांना साथ दिली आहे. येमेनमध्ये 8 ठिकाणी हे हल्ले करण्यात आले आहेत.
इराणचे समर्थनप्राप्त हूती बंडखोरांची क्षमता नष्ट करणे हाच या हल्ल्यांचा उद्देश होता. हूतींच्या हल्ल्यांमुळे मध्यपूर्वेच्या देशांची आर्थिक स्थिती, पर्यावरण आणि येमेनसारख्या देशांमध्ये मानवी सहाय्य पोहोचविण्यात सर्वाधिक समस्या निर्माण होत आहे. हूतींनी हल्ला केल्यास त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील असे अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टिन यांनी सांगितले आहे.
हल्ले करत राहू
अमेरिका-ब्रिटनने येमेनची राजधानी सनामध्ये अनेक हल्ले केले आहेत. गाझामधील पॅलेस्टिनींच्या समर्थनार्थ आम्ही चालवत असलेली मोहीम ते रोखू पाहत आहेत. परंतु त्यांचा हेतू यशस्वी होणार नसल्याचा दावा हूतींच्या अल मसीराह या प्रसारमाध्यमाने नमूद केले आहे.
लाल समुद्रात तणाव
लढाऊ विमाने, युद्धनौका आणि पाणबुडीद्वारे सना, सदा आणि धमार शहरांसोबत होदेइदाह प्रांतात हे हल्ले करण्यात आले आहेत. अमेरिका आणि ब्रिटनने यापूर्वी 28 जानेवारी आणि 11 जानेवारी रोजी देखील येमेनवर हल्ले केले होते. लाल समुद्रात हूती बंडखोरांकडून जहाजांना लक्ष्य करण्यात येत असल्याने आंतराष्ट्रीय व्यापारावर प्रतिकूल प्रभाव पडत आहे. भारताकडून युरोपला होणारा डिझेलचा पुरवठा मागील 2 वर्षांमधील नीचांकी स्तरावर पोहोचला आहे. यात सुमारे 90 टक्क्यांची घसरण झाली आहे. आशियातून युरोपीय महासंघ आणि ब्रिटनच्या दिशेने होणाऱ्या मालवाहतुकीचा खर्च वाढला आहे.