अमेरिका, ब्रिटनकडून येमेनवर पुन्हा हल्ला
हुती बंडखोरांच्या 8 ठिकाणांना केले लक्ष्य
वृत्तसंस्था/ सना
अमेरिका आणि ब्रिटनच्या सैन्याने मिळून मंगळवारी येमेनवर हल्ला केला आहे. सैनिकांनी हूती बंडखोरांच्या ताब्यातील भूभागावर हल्ले केले आहेत. हे हल्ले 8 ठिकाणी करण्यात आल्याची माहिती अमेरिकेच्या सैन्याने दिली आहे. यात जमिनीखाली तयार करण्यात आलेल्या शस्त्रास्त्र तळांनाही लक्ष्य करण्यात आले आहे.
हुती बंडखोर सातत्याने लाल समुद्रात जहाजांना लक्ष्य करत आहेत. याच्या विरोधात अमेरिका आणि ब्रिटन कारवाई करत आहे. दोन्ही देशांची ही दुसरी संयुक्त मोहीम आहे. यापूर्वी अमेरिका आणि ब्रिटनने 11 जानेवारी रोजी येमेनवर हवाई हल्ला केला होता. त्यावेळी 30 ठिकाणांवर हल्ले करण्यात आले होते आणि याकरता 150 क्षेपणास्त्रs तसेच बॉम्बचा वापर करण्यात आला होता. तर 11 जानेवारीपासून आतापर्यंत अमेरिकेनने 8 वेळा येमेनमध्ये हुती बंडखोरांच्या ठिकाणांना लक्ष्य केले आहे.
येमेनमध्ये करण्यात आलेल्या हल्ल्यांकरता अमेरिका आणि ब्रिटनच्या सैन्याला ऑस्ट्रेलिया, बहारिन, कॅनडा आणि नेदरलँडच्या सैन्याची साथ लाभली आहे. येमेनमधील सना, सदा आणि धमार शहरांसोबत होदेइदाह प्रांतात हे हल्ले करण्यात आले आहेत.
जागतिक व्यापाराकरता कारवाई
अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यात फोनवरून चर्चा झाल्यावर मंगळवारी हे हल्ले करण्यात आले आहेत. हुती बंडखोरांच्या हल्ल्यांमुळे लाल समुद्रातून जाणाऱ्या 2 हजार जहाजांना स्वत:चा मार्ग बदलावा लागला होता. या सागरी मार्गाने जगभरात सामग्रीची आयात-निर्यात होत असते. सुमारे 15 टक्के सागरी वाहतूक याच मार्गाने होते. हुती बंडखोरांच्या हल्ल्यांमुळे युरोप आणि आशिया यांच्यातील मुख्य मार्गावर आंतरराष्ट्रीय व्यापार संकटात सापडला आहे. इस्रायल-हमास युद्धामुळे हुती बंडखोरांनी गाझाचे समर्थन करण्यासाठी लाल समुद्रात जहाजांवर हल्ले सुरू पेले आहेत.
स्वरक्षणासाठी कारवाई : ब्रिटन
आम्ही हे हल्ले स्वरक्षणासाठी केले आहेत. हुती बंडखोरांचे हल्ले आम्ही सहन करणार नाही. हुती बंडखोरांची शक्ती कमी करणे हा आमचा उद्देश असल्याचे ब्रिटनचे संरक्षण सचिव ग्रांट शाप्स यांनी सांगितले आहे.
भारतावरही प्रभाव
23 डिसेंबर रोजी लाल समुद्रात एमव्ही साईबाबा जहाजावर हल्ला झाला होता. हे जहाज भारताच्या दिशेने येत होते आणि यावरील चालक दलामध्ये 25 भारतीय सामील होते. यानंतर या भारतीय नौदलाने 5 युद्धनौका या क्षेत्रात तैनात केल्या आहेत. सागरी मार्गाच्या सुरक्षेकरता पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय समुदाय चिंतेत पडला आहे. अमेरिका, चीन, भारतासमवेत अनेक देश एकत्र दिसून येत आहेत. भारताचा 80 टक्के व्यापार सागरी मार्गाने होतो. तर 90 टक्के इंधन देखील सागरी मार्गानेच येते.