व्हेनेझुएलाच्या नौकेवर अमेरिकेचा हल्ला
3 जणांचा मृत्यू : नौकेवर अमली पदार्थ असल्याचा अमेरिकेचा आरोप
वृत्तसंस्था/ कराकस
अमेरिकेच्या सैन्याने पुन्हा एकदा व्हेनेझुएलाच्या ड्रग तस्करांच्या नौकेवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात 3 जण मृत्युमुखी पडल्याची माहिती अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे. हे ड्रग्ज तस्कर नार्को टेररिस्ट म्हणजेच ड्रग कार्टेलशी निगडित दहशतवादी असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. माझ्या आदेशावर अमेरिकेच्या सैन्याने अमली पदार्थांची तस्करी करणारे कार्टेल आणि नार्को टेररिस्टवर स्ट्राइक केला आहे. व्हेनेझुएलामधील हे लोक अमेरिकेच्या दिशेने अमली पदार्थ नेत होते. ड्रग कार्टेल अमेरिकेची राष्ट्रीय सुरक्षा, विदेश धोरण आणि हितांसाठी मोठा धोका आहे. या कारवाईदरम्यान अमेरिकेच्या सुरक्षा दलांना कुठलेही नुकसान झाले नसल्याचे ट्रम्प यांनी सांगितले आहे. 2 आठवड्यांपूर्वी अमेरिकेच्या सैन्याने व्हेनेझुएलाच्या कुख्यात ट्रेन डी अरागुआ टोळीशी निगडित 11 जणांना ठार केले होते. ड्रग कार्टेलच्या विरोधात अमेरिका आणखी मोठे हल्ले करणार असल्याचे संकेत विदेशमंत्री मार्को रुबियो यांनी दिले आहेत.
दहशतवादी संघटना घोषित
ट्रेन डी अरागुआ टोळीला अमेरिकेने दहशतवादी संघटना घोषित पेले आहे. ट्रम्प प्रशासनाने फेब्रुवारी महिन्यात व्हेनेझुएलाच्या ट्रेन डी अरागुआ, अल साल्वाडोरच्या एमएस-13 आणि मेक्सिकोच्या 6 ड्रग कार्टेल्सना विदेशी दहशतवादी संघटना घोषित केले होते. परंतु अमेरिकेच्या संसदेने ट्रेन डी अरागुआ किंवा व्हेनेझुएलाच्या विरोधात कुठल्याही प्रकारच्या सैन्य कारवाईला मंजुरी दिलेली नाही.
सैन्यशक्तीचा वापर
ड्रग तस्करांच्या विरोधात सैन्यशक्तीचा वापर करण्याचा अधिकार सरकारला असल्याचा दावा विदेशमंत्री रुबियो यांनी केला होता. परंतु दहशतवादी घोषित केल्याने सरकारला त्यांची संपत्ती जप्त करणे किंवा आर्थिक निर्बंध लादण्याचा अधिकार आहे, पण युद्धासारखी कारवाई करण्याचा अधिकार मिळत नसल्याचे कायदेतज्ञांचे सांगणे आहे.