येमेनमधील हुथी बंडखोरांवर अमेरिकेचा हल्ला
पाच शस्त्रास्त्र डेपो नष्ट : प्रथमच बी -2 बॉम्बर विमानाचा वापर
वृत्तसंस्था/वॉशिंग्टन
अमेरिकन हवाई दलाने बुधवारी रात्री येमेनमधील हुथी बंडखोरांच्या स्थानांवर बॉम्बहल्ला केला. अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांच्या हवाल्याने अल् जझिराने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. या हल्ल्यांसाठी अमेरिकेने प्रथमच बी-2 स्टेल्थ बॉम्बर विमानाचा वापर करण्यात आला. या विमानातून येमेनची राजधानी सानाजवळील 5 लक्ष्यांवर अचूक हल्ला केला. यात एकूण पाच शस्त्रागारे नष्ट झाली आहेत. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या सूचनेवरून हे हल्ले करण्यात आल्याचे अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी सांगितले. हुथी बंडखोरांनीही या हल्ल्याला दुजोरा दिला आहे. मात्र, किती नुकसान झाले याबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. याची किंमत अमेरिकेला चुकवावी लागेल, असे हुथीचे उपप्रमुख नसऊद्दीन आमेर म्हणाले.
हुथी बंडखोरांनी प्राणघातक शस्त्रे जमिनीखाली लपवून ठेवली होती. त्यांनी इतर देशांवर हल्ला करण्यासाठी आणि लाल समुद्र आणि एडनच्या आखातातील जहाजांना लक्ष्य करण्यासाठी याचा वापर केल्याचे निदर्शनास आल्यानंतर हा हल्ला करण्याचा पवित्रा अमेरिकेने घेतला. शत्रूने कितीही खोलवर शस्त्रे जमिनीखाली लपवून ठेवली तरी आम्ही त्यांना शोधून नष्ट करू, असा इशारा अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी दिला आहे. सीएनएनच्या वृत्तानुसार, अमेरिकेने येमेनमध्ये बी-2 बॉम्बरचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी अमेरिकन लष्कर येमेनमध्ये लढाऊ विमानांचा वापर करत आहे. अवघ्या महिन्याभरापूर्वी अमेरिकेने हिंद महासागरात स्थित डिएगो गार्सिया या गुप्त लष्करी तळावर बी-2 स्टेल्थ बॉम्बर तैनात केले होते.
हल्ल्यामागील कारण
इस्रायल 7 ऑक्टोबरपासून गाझावर हल्ले करत आहे. याचदरम्यान हुथी बंडखोर समुद्रात इस्रायलच्या मित्र देशांच्या जहाजांना लक्ष्य करत आहेत. सीएनएनच्या म्हणण्यानुसार, आत्तापर्यंत हुथी बंडखोरांनी समुद्रातील 100 हून अधिक जहाजांवर हल्ला केला आहे. अशा घटना रोखण्यासाठी अमेरिकेने हल्ल्याची चाल खेळल्याची चर्चाही आहे.
अमेरिकेकडे 19 बी-2 स्टेल्थ बॉम्बर विमाने
रिपोर्ट्सनुसार, बी-2 स्टेल्थ बॉम्बर हे अमेरिकेचे सर्वात घातक शस्त्र मानले जाते. शीतयुद्धाच्या काळात अमेरिका आणि रशिया धोकादायक शस्त्रांच्या शर्यतीत गुंतले होते. त्यानंतर 1987 ते 2000 पर्यंत अमेरिकेत बी-2 स्टेल्थ बॉम्बर तयार करण्यात आले होते. अमेरिकेने बी-2 स्टेल्थ बॉम्बरच्या 132 युनिट्सचे उत्पादन करण्याचे लक्ष्य ठेवले होते, परंतु केवळ 21 विमाने बनवता आली. 2008 आणि 2022 मध्ये दोन बी-2 विमानांना अपघात झाला. अमेरिकेकडे आता फक्त 19 बी-2 स्टेल्थ बॉम्बर्स शिल्लक आहेत.