येमेनमधील हूतींवर अमेरिकेचा एअर स्ट्राइक
हवाई हल्ल्यात 32 जणांचा मृत्यू : ट्रम्प यांच्या आदेशानंतर कारवाई
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेने येमेनमधील इराणचे समर्थनप्राप्त हूती बंडखोरांच्या विरोधात जोरदार हल्ले केले आहेत. लाल समुद्रात हुती बंडखोरांकडून सातत्याने मालवाहू जहाजांना लक्ष्य करण्यात येत असल्याने अमेरिकेने हे पाऊल उचलले आहे. हुतींकडून संचालित आरोग्य मंत्रालयानुसार येमेनची राजधानी सनावर अमेरिकेने केलेल्या हल्लयात 32 जण मारले गेले असून 9 जण जखमी झाले आहेत. तसेच अनेक इमारती जमीनदोस्त झाल्याचे समोर आले आहे. अमेरिकेने हुती बंडखोरांच्या शस्त्रसाठ्यांना लक्ष्य केल्याचे समजते.
हुतींच्या राजकीय ब्युरोने या हल्ल्यांना ‘युद्धगुन्हा’ ठरविले आणि अमेरिकेचे हल्ले उत्तरेकडील प्रांत सादापर्यंत जारी राहिल्याचे म्हटले आहे. येमेनचे सशस्त्र दल वाढत्या तणावाला प्रत्युत्तर देण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचे हुतींनी म्हटले आहे. अमेरिकेचे दावे खोटे आाहेत. बाब अल-मंदब सामुद्रधुनी क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय वाहतुकीला आम्ही प्रभावित केलेले नाही. येमेनकडुन घोषित सागरी नाकाबंदी केवळ इस्रायलच्या नौदलाच्या नौकांपुरती मर्यादित आहे आणि याचा उद्देश गाझाच्या लोकांपर्यंत मानवीय सहाय्य पोहोचविणे असल्याचा दाव हुतींचे प्रवक्ते मोहम्मद अब्दुल-सलाम यांनी केला आहे.
हुती बंडखोरांचे हल्ले बंद न झाल्यास ‘नरकासारखी स्थिती करू’ असा इशारा अमेरिकेने दिला आहे. तसेच अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हुती बंडखोरांना समर्थन देणाऱ्या इराणलाही इशारा दिला आहे. इराणने आता बंडखोरांना समर्थन देणे थांबवावे असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प हे इराणवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून याचकरता हे हवाई हल्ले करण्यात आल्याचे मानले जात आहे. इराणसोबत पुन्हा आण्विक करार करण्याचा त्यांचा विचार आहे.
येमेनच्या शुब जिल्ह्यातील जेराफ भागात अमेरिकेने हवाई हल्ले केले आहेत. यानंतर झालेले विस्फोट अत्यंत शक्तिशाली होते अशी माहिती स्थानिक लोकांकडून देण्यात आली.
तोवर हल्ले जारी राहणार
महत्त्वपूर्ण सागरी मार्गाला लक्ष्य करण्याचे सत्र हुती बंडखोर जोपर्यंत थांबवत नाहीत तोवर आम्ही हल्ले जारी ठेवणार आहोत. कुठलीही दहशतवादी संघटना अमेरिकेच्या व्यापारी आणि नौदलाच्या जहाजांना जगाच्या जलमार्गांवर स्वतंत्रपणे ये-जा करण्यापासून रोखू शकत नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
येमेनच्या बहुतांश भागावर नियंत्रण
हुतींनी मागील दशकात येमेनच्या बहुतांश हिस्स्यावर नियंत्रण मिळविले होते. हुती बंडखोरांनी नोव्हेंबर 2023 पासून जहाजवाहतुकीला लक्ष्य करत 100 हून अधिक हल्ले केले आहेत. यामुळे जागतिक व्यापारी वाहतुकीला अडथळे निर्माण झाले आहेत. हुतींकडून होणारे ड्रोन अन् क्षेपणास्त्र हल्ले रोखण्यासाठी अमेरिकेसह अनेक देशांनी स्वत:च्या युद्धनौका या भागात तैनात केल्या आहेत.
हल्ल्याचे लाइव्ह टेलिकास्ट पाहत होते ट्रम्प
अमेरिकेचे सैन्य हुती बंडखोरांवर हवाई हल्ले करत असताना ट्रम्प ही घटना लाइव्ह पाहत होते. व्हाइट हाउसने अधिकृत एक्स हँडलवर या घटनेचा उल्लेख करत काही छायाचित्रे शेअर केली आहेत. या छायाचित्रांमध्ये ट्रम्प हे अधिकाऱ्यांसोबन घटनांवर नजर ठेवून असल्याचे दिसून येते.