मेक्सिकोत ड्रग माफियांवर अमेरिकेचा एअर स्ट्राइक?
अभियानात सीआयए सामील होणार : सैन्य पाठविण्यावर लवकरच निर्णय घेणार ट्रम्प
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमली पदार्थांच्या तस्करीला रोखण्यासाठी अमेरेकचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मेक्सिकोत अमेरिकेचे सैन्य आणि गुप्तचर अधिकाऱ्यांना पाठविण्याची तयारी करत असल्याचा दावा एका वृत्तवाहिनीने केला. या अभियानात सीआयए देखील सामील होऊ शकते असे सांगण्यात येतेय. ट्रम्प प्रशासनाने मेक्सिकोत ड्रग कार्टेल्सला लक्ष्य करण्यासाठी या अभियानाच्या नियोजनावर काम सुरू पेले आहे.
संभाव्य अभियानाशी संबंधित प्रारंभिक प्रशिक्षण सुरू झाले आहे. मेक्सिकोच्या भूमीवरही अभियान राबविले जाऊ शकते, परंतु सैन्य पाठविण्याचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
हवाई हल्ले अन् ड्रोन स्ट्राइक
या अभियानात अमेरिकेच्या जॉइंट स्पेशल ऑपरेशन्स कमांडच्या टीम्स सामील होऊ शकतात, ज्या सीआयएच्या अधिकारक्षेत्रात काम करतील. अभियानाच्या अंतर्गत ड्रग लॅब्स आणि कार्टेल म्होरक्यांना लक्ष्य करण्यासाठी ड्रोन स्ट्राइकची योजना आहे. फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेच्या विदेश विभागाने 6 मेक्सिकन कार्टेल्स, एमएस-13 गँग आणि व्हेनेझुएलाच्या ‘ट्रेन डे अरागुआ’ला विदेशी दहशतवादी संघटना घोषित केले होते. यामुळे अमेरिकेचे सैन्य आणि सीआयएला गुप्त अभियान राबविण्याची खुली सूट मिळाली आहे. व्हेनेझुएलात सीआयएच्या कारवाईला मंजुरी दिली आहे आणि गरज भासल्यास कार्टेल्सना जमिनीवरूनही लक्ष्य करू असे ट्रम्प यांनी यापूर्वीच म्हटले आहे.
मेक्सिकोकडून ड्रग तस्करी
मेक्सिकोला जगातील सर्वात मोठ्या ड्रग तस्करी नेटवर्कचे केंद्र मानले जाते. मेक्सिकोमधूनच कोकेन, हेरॉइन, मेथ आणि फेंटनाइल यासारखी धोकादायक ड्रग्ज अमेरिकेपर्यंत पोहोचतात. अमेरिकेच्या यंत्रणांनुसार देशात ड्रग्जचा सर्वात मोठा पुरवठा मेक्सिकन कार्टेल्सद्वारे होतो. अमेरिकेत दरवर्षी लाखो लोक अमली पदार्थांच्या सेवनामुळे मृत्युमुखी पडतात. ड्रग तस्करी विरोधात कठोर पावले उचलण्यासाठी अमेरिकेच्या प्रशासनावर मोठा दबाव आहे. दुसरीकडे ड्रग्ज कार्टेल्स मेक्सिकोत अत्यंत शक्तिशाली असल्याने अनेक भागांमध्ये ते पोलीस आणि सरकारलाच आव्हान देत असतात. शस्त्रास्त्रसज्ज टोळी, धमकी, भ्रष्टाचार आणि हिंसमुळे स्थानिक प्रशासनही अनेकदा त्यांना रोखू शकत नाही. अनेक ड्रग्ज कार्टेल्स तर स्वत:ला प्रतिसरकारप्रमाणे चालवत असतात.
100 वर्षांनी मेक्सिकोत उतरणार सैनिक
अमेरिकेच्या सैन्याने सर्वप्रथम 1916 साली मेक्सिकोत प्रवेश केला होता. तेव्हा जनरल जॉन पर्शिंग यांनी मेक्सिकन क्रांतिकारी पॅनचो विलाचा पाठलाग करण्यासाठी सैन्य पाठविले होते. तेव्हापासून अमेरिका मेक्सिकोत थेट सैन्य कारवाई करणे टाळत आला आहे. कायदेशीर स्वरुपात अमेरिका मेक्सिकोच्या अनुमतीशिवाय तेथे सैन्य पाठवू शकत नाही आणि मेक्सिकोने नेहमीच कुठल्याही विदेशी सैन्याच्या हस्तक्षेपाला विरोध केला आहे. संबंधित अभियान राबविण्यात आल्यास 100 वर्षांनी मेक्सिकोत अमेरिकेचे सैन्य पहिल्यांदाच तैनात होणार आहे.