उरुग्वे, कोलंबिया उपांत्य फेरीत दाखल
वृत्तसंस्था/ लास व्हेगास, ग्लेनडेल
2024 सालातील कोपा अमेरिका चषक फुटबॉल स्पर्धेत उरुग्वे संघाने बलाढ्या ब्राझीलचा पेनल्टी किकमध्ये 4-2 पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. त्याचप्रमाणे या स्पर्धेतील अन्य एका उपांत्य फेरीच्या लढतीत कोलंबियाने पनामाचा एकतर्फी पराभव करत शेवटच्या चार संघात स्थान मिळविले.
उरुग्वे आणि ब्राझील यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीचा हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचा झाला. निर्धारित वेळेमध्ये दोन्ही संघांना आपले खाते उघडता न आल्याने पंचाने पेनल्टी किकचा अवलंब केला. या सामन्यात दोन्ही दर्जेदार संघांकडून 41 फाऊल्स नोंदविले गेले. तर गोलपोस्टच्या दिशेने 4 फटके मारले गेले. उरुग्वेचा हुकमी खेळाडू नांझेजला 74 व्या मिनिटाला पंचांनी लाल कार्ड दाखवून मैदानाबाहेर काढल्याने उरुग्वेला उर्वरित कालावधीत 10 खेळाडूनिश्चि खेळावे लागले. पण ब्राझीलला शेवटपर्यंत उरुग्वेच्या भक्कम बचावफळीला हुलकावणी देता आली नाही. पेनल्टी किकमधील पाचव्या फटक्यावर मॅन्यूअल युगार्टेने विजयी गोल नोंदविला. पेनल्टी किकच्या कालावधीत तिसऱ्या फेरीअखेर उरुग्वेने ब्राझीलवर 3-1 अशी आघाडी घेतली होती. गोलरक्षक सर्जिओ रॉचेटने इडेर मिलाटेओ आणि लुझ यांचे फटके व्यवस्थितपणे थोपविले. तर ब्राझीलचा गोलरक्षक अॅलिसन बेकरने उरुग्वेच्या गिमेनेझचा चौथा फटका अडवून आपल्या संघाचे आव्हान जिवंत ठेवले होते. पणे मॅन्यूअल युगार्टेने निर्णायक विजयी गोल करुन ब्राझीलचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले. आता या स्पर्धेत बुधवारी रात्री उरुग्वे आणि कोलंबिया यांच्यात उपांत्य फेरीचा सामना खेळविला जाणार आहे. ब्राझील संघातील स्ट्रायकर व्हिनिसियस ज्युनिअर याला या सामन्यात खेळता आले नाही. कारण यापूर्वी त्याला पंचांनी दोन वेळेला पिवळी कार्डे दाखविल्याने त्याच्यावर एक सामन्यासाठी बंदी घालण्यात आली होती. फिफाच्या विश्वकरंडक पात्र फेरीच्या फुटबॉल सामन्यात उरुग्वेने ब्राझीलवर मात केली होती. 2001 पासून या दोन संघांमध्ये आतापर्यंत 13 सामने खेळवले गेले असून उरुग्वेचा ब्राझीलवरील हा पहिला विजय आहे.
शनिवारी उशिरा ग्लेनडेल येथे खेळविण्यात आलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात कोलंबियाने पनामाचा 5-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या सामन्यात कोलंबियातर्फे जॉन कोर्दोबा, जेम्स रॉड्रिग्ज आणि लुस डायझ याने पूर्वार्धात गोल नोंदविले. शनिवारचा हा सामना होण्यापूर्वी कोलंबियाने विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सलग 26 सामन्यात एकही पराभव स्वीकारलेला नव्हता. शनिवारचा सामना सुरु झाल्यानंतर 8 व्या मिनिटाला जॉन कोर्दोव्हाने हेडरद्वारे गोल नोंदवून कोलंबियाचे खाते उघडले. 18 व्या मिनिटाला जेम्स रॉड्रिग्जने पेनल्टी किकवर कोलंबियाचा दुसरा गोल केला. 32 वर्षीय रॉड्रिग्जचा हा आंतरराष्ट्रीय सामन्यातील 28 वा गोल आहे. 41 व्या मिनिटाला डायझने कोलंबियाचा तिसरा गोल नोंदविला. मध्यंतरावेळी कोलंबियाने पनामावर 3-0 अशी आघाडी मिळविली होती. 70 व्या मिनिटाला रिचर्ड रिओसने कोलंबियाचा चौथा गोल केला. सामना संपण्यास 2 मिनिटे बाकी असताना मिगेल बोर्जाने पेनल्टीवर कोलंबियाचा पाचवा आणि शेवटचा गोल नोंदवून पनामाचे आव्हान एकतर्फी संपुष्टात आणले. आता कोलंबियाचा उपांत्य फेरीचा सामना उरुग्वे बरोबर येत्या बुधवारी खेळविला जाणार आहे.
सामन्यांचे निकाल
उरुग्वे वि. वि. ब्राझील, 4-2
कोलंबिया वि. वि. पनामा, 5-0