युपीएससी टॉपरचे बोल...
यंदाच्या युपीएससी यासारख्या अवघड परीक्षेत देशात पहिली आलेल्या उत्तर प्रदेशमधील शक्ती दुबे हिचे देशभर कौतुक होत आहे. अखिल भारतीय स्तरावर पाहता युपीएससी सिव्हील सर्व्हिसेस परीक्षेत भारताची ही कन्या पहिली आली आहे. तिचा नुकताच उत्तर प्रदेशात राज्याचे डिजीपी प्रशांत कुमार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राज्याचे पोलीस मुख्यालय असणाऱ्या लखनऊत आयोजीत समारंभात या कन्येने उत्स्फुर्त असे प्रेरणादायी भाषण केले. जे आजच्या पिढीकरीता आवर्जून प्रेरणा देणारे ठरेल. तिने आपल्या भाषणात भाषेवर मत व्यक्त करताना भाषा ही कधीच अडथळा ठरली नसल्याचे म्हटले आहे. युपीएससी परीक्षा हिंदी वा इंग्रजी या दोन भाषेत देता येते, तेव्हा भाषेचा प्रश्न उदभवत नाही. यासारख्या परीक्षांची तयारी करताना अभ्यासात स्पष्टता, सातत्यता यावर भर देणे गरजेचे आहे. शिवाय रोजच्या रोज वर्तमानपत्रे वाचणे अत्यंत म्हणजे अत्यंत गरजेचे आहे, असेही तिने आवर्जून नमूद केले. या माध्यमातून आपल्याला रोजच्या घडामोडींची उपयुक्त माहिती करुन घेता येत असते. चालू घडामोडींवर जास्तीत जास्त भर दिल्यास पूर्वपरीक्षा व मुख्य परीक्षेकरीता ते खूप फायद्याचे ठरते. अलाहाबाद विद्यापीठात पदवी आणि बनारस हिंदु विद्यापीठातून एमएससी (बायोकेमिस्ट्री) पदवी पूर्ण केलेल्या शक्ती दुबेने 2018 पासून नागरि सेवा परीक्षेची (सीव्हील सर्व्हिसेस) तयारी सुरु केलेली होती. सातत्याने मेहनतीने, जिद्दीने दरवर्षी प्रयत्न करत राहिली आणि पाचव्या वेळी मात्र तिची कामगिरी सर्वार्थाने फुलून आली. लवचिकता आणि संयम न ढळू देता तिने आपल्या प्रयत्नांना धार चढवली. दैनंदिन कठोर मेहनतीशिवाय हे शक्य नसल्याचे तिने म्हटले आहे. यशाला कोणताही शॉर्टकट असत नाही, हेही तिने नमूद केले. इतरांना या परीक्षेविषयी मार्गदर्शनपर सांगताना तिने अशा परीक्षांची तयारी करायची असेल तर दररोज किमान 8 ते 10 तास निष्ठापूर्वक अभ्यास करणे गरजेचे आहे. पूर्णपणे झोकून देऊन अभ्यास करणे हेच महत्त्वाचे. अशा परीक्षांमध्ये यश मिळायला दीर्घकाळही लागू शकतो, तेव्हा ही तयारीही सोबत ठेवत मनोधैर्य शाबूत ठेवण्याची कला आत्मसात करायची गरज असते, असे तिने म्हटले.
पहिल्या किंवा दुसऱ्या प्रयत्नात यश जरी मिळालं नाही तरी हरकत नाही. प्रयत्न चालूच ठेवावे लागतात. मलाही हे यश पाचव्यावेळी मिळाले, हे लक्षात ठेवा, असेही ती म्हणाली. यापूर्वीच्या परीक्षेतील चुका दुरुस्त करत अधिक हार्डवर्कवर भर देणं महत्त्वाचं. अशा परीक्षांना सामोरे जाताना इच्छुक उमेदवारांनी अभ्यासावर आपला सर्वोच्च फोकस ठेवायला हवा. यापूर्वीच्या प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव अधिक चांगल्या प्रकारे करायला हवा. परीक्षेची पद्धत जाणून त्याप्रमाणे परीक्षेला सामोरे जाण्याची तयारी करायची गरज असते. शक्ती दुबे ही उत्तर प्रदेशमधील प्रयागराज जिल्ह्यात राहणारी आहे. अलाहाबाद विद्यापीठातून पदवी, बनारस हिंदू विद्यापीठातून एमएससी केल्यानंतर तिला वेगळे काही तरी करावेसे वाटले. विज्ञान शाखेतलं यश होतंच पण यापेक्षाही मोठं काहीतरी करावं असे तिला मनोमनी वाटू लागले. जनतेशी संपर्क करुन त्यांची आव्हाने जाणून त्या सोडवण्याबाबतचे विचार तिच्या मनात घोळू लागले. यातूनच तिला युपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेचा मार्ग दिसला. सिव्हील सर्व्हिसेस परीक्षेत तीनवेळा पूर्वपरीक्षेमध्ये अपयश आले. चौथ्या प्रयत्नात ती युपीएससी मेनकरीता पात्र ठरली. पाचव्या प्रयत्नात ती तीनही टप्प्यात पात्र ठरली. प्रीलीम्स, मेन्स आणि इंटरव्युव्ह अशा तीनही टप्प्यात ती यशस्वी झाली. यातून ती अखिल भारतीय स्तरावर पहिली आली. तिने राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध हा पर्यायी विषय परीक्षेकरीता निवडला होता. शक्ती दुबेचे वडिल देवेंद्र दुबे हे पोलीस विभागात उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सर्वोच्च कामगिरी नोंदवत ती भारतात पहिली आली. या परीक्षेत यंदाही मुलींचे प्रमाण वाढलेले दिसले आहे.
दीपक कश्यप