For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राहुल गांधींच्या ‘हिंदू’ विधानावर गदारोळ

06:58 AM Jul 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
राहुल गांधींच्या ‘हिंदू’ विधानावर गदारोळ
Advertisement

लोकसभेत पंतप्रधान मोदी-राहुल गांधींमध्ये ‘शब्दयुद्ध’ : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेवेळी खडाखडी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी लोकसभेत अनेक मुद्यांवर सरकारला धारेवर धरले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेत भाग घेताना राहुल गांधी यांनी मांडलेल्या मुद्यांवेळी सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. राहुल गांधी यांनी केलेल्या ‘हिंदूं’संबंधीच्या वक्तव्यावर पंतप्रधान मोदींनी हस्तक्षेप करत त्यांना रोखले. यावेळी दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. सभागृहात द्वयींमध्ये शाब्दिक संघर्ष होण्याची कदाचित दहा वर्षांतील ही पहिलीच वेळ असेल. राहुल गांधींच्या भाषणावेळी इतर अनेक मंत्र्यांनीही राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर वेळीच प्रत्युत्तर दिले.

Advertisement

विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी यांनी अग्निवीर, नीट आणि शेतकऱ्यांच्या मुद्यांवरून सरकारवर निशाणा साधला. विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी यांची सभागृहातील शैली बदललेली दिसून आली. पण राहुल गांधींच्या हिंदू विधानावर सर्वात मोठा गदारोळ पाहायला मिळाला. राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान एके दिवशी आपल्या भाषणात म्हणाले की, भारताने कधीही कोणावरही हल्ला केला नाही. भारत हा अहिंसेचा देश आहे. असे म्हणत त्यांनी भगवान शंकरांचे चित्र दाखवले. जे स्वत:ला हिंदू म्हणवतात ते चोवीस तास हिंसा आणि द्वेष करतात... तुम्ही मुळीच हिंदू नाही, असे राहुल गांधी यांनी सांगताच सत्ताधारी पक्षातून गदारोळ सुरू झाला. राहुल गांधींच्या या आरोपावर पंतप्रधान मोदी यांनी हस्तक्षेप करत संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे ही गंभीर गोष्ट असल्याचे सांगत अध्यक्षांसमोर दाद मागितली. या गदारोळात राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजप हा संपूर्ण हिंदू समाज नाही, असे उत्तर देताच सत्ताधारी आणि विरोधक असा वाद भडकल्याने सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. राहुल गांधी यांनी शिवशंकराचे चित्र दाखवल्यानंतर लोकसभाध्यक्षांनी त्यांना नियमपुस्तिका दाखवत सभागृहाचे नियम पाळण्याचा सल्ला दिला. याचदरम्यान, भाजप खासदारांनी विरोधी पक्षनेत्यांना त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागण्यास सांगितले.

गृहमंत्र्यांनीही फटकारले

विरोधी पक्षनेत्यांनी सभागृहात भगवान शंकराचे चित्र दाखवून सत्य, धैर्य आणि अहिंसा ही भगवान शंकराची प्रेरणा असल्याचे सांगितले. अयोध्येतील भाजपच्या पराभवाचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले की, भगवान श्रीरामांनी भाजपला संदेश दिला आहे. आपल्यावरही हल्ला झाल्याचे त्यांनी सांगितले. सरकारच्या पंतप्रधानांच्या आदेशावरून माझ्यावर 20 हून अधिक गुन्हे दाखल झाले, मला दोन वर्षांचा तुऊंगवास झाला... 55 तास माझी चौकशी झाली, असेही राहुल गांधी यांनी सभागृहात सांगितले. राहुल गांधींच्या भाषणाच्या शेवटी गृहमंत्री अमित शहा यांनी दाद मागत विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलेल्या अनेक गोष्टींमध्ये तथ्य आणि सत्य नसल्याचे अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिले. त्यांच्या गोष्टींची पडताळणी करण्याची विनंती त्यांनी लोकसभा अध्यक्षांना केली. यावर पडताळणी केली जाईल, असे लोकसभाध्यक्ष बिर्ला यांनी सांगितले.

अग्निवीर आणि शेतकऱ्यांबाबतही भाष्य

अग्निपथ योजनेचा संदर्भ देत राहुल गांधी यांनी सैनिकांमध्ये भेदभाव निर्माण झाला असून अग्निवीरांच्या मृत्यूनंतर त्यांना ‘हुतात्मा’चा दर्जा मिळत नाही आणि त्यांच्या कुटुंबीयांना सामान्य सैनिकाप्रमाणे पेन्शन आणि मदत मिळत नाही, असे स्पष्ट केले. अग्निपथ योजना ही लष्कराची नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बुद्धीची उपज असल्याचा आरोप त्यांनी केला. आमचे सरकार आल्यावर आम्ही ते संपवू, असा दावाही केला. यावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आक्षेप घेत विरोधी पक्षनेते सभागृहात चुकीची माहिती देत असल्याचे सांगितले. सेवेत असताना प्राण गमावलेल्या अग्निवीरच्या कुटुंबीयांना एक कोटी ऊपयांची मदत देण्याची तरतूद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित करताना एमएसपीचा उल्लेख करण्यात आला. शेतकऱ्यांना एमएसपी दिला जात नसल्याचे राहुल गांधी म्हणाले. त्यावर कृषिमंत्री शिवराज सिंह यांनी उभे राहून राहुल गांधींच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला.

भगवान शिव, गुरूनानक यांची छायाचित्रे दाखवली

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सोमवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून पहिले भाषण केले. भगवान शिव आणि गुऊनानक यांचे फोटो दाखवून त्यांनी भाषणाला सुऊवात केली. राहुल यांनी 90 मिनिटे भाषण केले. राहुल यांचे भाषण सुरू होताच काही वेळाने सभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांना रोखत सभागृहाने नियम आणि कार्यपद्धती पाळली पाहिजे. नियमानुसार सभागृहात कोणतेही फोटो किंवा फलक लावू नयेत, असे ठणकावले.

Advertisement
Tags :

.