For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लोकांनी केलाय अपप्रचाराचा पराभव

06:58 AM Jul 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
लोकांनी केलाय अपप्रचाराचा पराभव
Advertisement

पंतप्रधान मोदींचे लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही विरोधकांवर टीकास्त्र, काँग्रेस घटनेचा सर्वात मोठा शत्रू असल्याचा आरोप

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतातील सुजाण मतदारांनी अपप्रचाराचा पराभव केला आहे. देशाचा निरंतर विकास करण्याचे ध्येय बाळगलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला लोकांनी सलग तिसऱ्यांदा विजयी करून मोठा जनादेश दिला आहे. तथापि, काही पक्ष त्यांचा पराभवही विजय असल्याचे हास्यास्पदरित्या भासवत, स्वत:ची पाठ थोपटून घेत आहेत. त्यांना जनादेशाचा अर्थ समजलेलाच नाही, अशी खोचक टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर केली आहे.

Advertisement

राज्यसभेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषण प्रस्तावावरील आभार प्रदर्शन चर्चेला ते उत्तर देत होते. मंगळवारी त्यांनी लोकसभेत विरोधकांच्या सर्व आरोपांना चोख प्रत्युत्तर दिले होते. आज राज्यसभेतही त्यांनी विरोधकांवर वाक्प्रहार केले. देशाची राज्यघटना धोक्यात आल्याचे ढोल काँग्रेसकडून बडविले जात आहेत. तथापि, घटनेला खरा धोका देण्याचे काम काँग्रेसनेच केले आहे. काँग्रेसच राज्यघटनेचा खरा शत्रू आहे, हे आणीबाणीच्या घटनेवरून सिद्ध होते. आज आणीबाणीच्या काळ्या अध्यायाला 50 वर्षे होत असताना पुन्हा एकदा त्यावेळी काँग्रेसकडून झालेल्या घटनेच्या पायमल्लीचे स्मरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे काँग्रेस आज व्यक्त करत असलेले घटनाप्रेम ही त्या पक्षाची दांभिकता आहे, हे सर्वांच्या लक्षात आले आहे, अशा शब्दांमध्ये त्यांनी काँग्रेसचा समाचार घेतला.

केंद्राच्या कामगिरीचा आढावा

गेल्या 10 वर्षांमध्ये केंद्र सरकारने विविध क्षेत्रांमध्ये केलेल्या कामगिरीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात घेतला. भारत आज जगात पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. येत्या पाच वर्षांमध्ये तो तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनू शकतो. 2047 पर्यंत भारताला एक विकसित राष्ट्र म्हणून समोर आणण्याचे आमचे ध्येय आहे. आर्थिक सुधारणांच्या कार्यक्रमाला आम्ही गती दिली आहे. वस्तू-सेवा करप्रणालीच्या रुपाने एक सुसूत्र करव्यवस्था साकारण्यात आली असून त्यामुळे सरकारच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. गरीबांचे कल्याण ही आमची प्राथमिकता असून त्यांच्या विकासासाठी अनेक अभिनव योजना आम्ही लागू केल्या. काही विकासविरोधी लोक आमच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहेत. तथापि, त्यांना नमवून आम्ही पुढे जात राहू. आम्हाला कोणी रोखू शकणार नाही, असा विश्वास त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला.

लोकांचा आमच्यावरच विश्वास

काँग्रेस किंवा अन्य विरोधी पक्षांनी घटनेच्या नावाने कितीही गळे काढले असले, तरी घटनेचे संरक्षण आम्हीच चांगल्याप्रकारे करु शकतो, असा या देशातील सर्वसामान्यांचा विश्वास आहे. म्हणून त्यांनी काँग्रेसला आणि तिच्या मित्रपक्षांना सलग तिसऱ्यांदा विरोधी पक्षातच बसवले आहे. मात्र आम्हाला पुन्हा सत्तेत येण्याची संधी दिली. गेल्या 60 वर्षांमध्ये असे प्रथमच घडले आहे, हे विरोधी पक्षांनी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे, असेही प्रतिपादन त्यांनी भाषणात केले.

काँग्रेसकडून अनेकदा घटनेचा अवमान

काँग्रेसने आपल्या सत्ताकाळात अनेकदा घटनेची पायमल्ली केली आहे. 1975 ची आणीबाणी हे एकच उदाहरण नाही. लोकसभेचा कार्यकाळ पाच वर्षांवरुन सहा वर्षांचा करणे हा देखील घटनाभंग होता. त्यानंतर 1977 मध्ये लोकसभा निवडणूक झाली. ती विरोधी पक्षांनी घटनेच्या संरक्षणाच्या मुद्द्यावरुन एकत्रितरित्या लढविली. लोकांनी त्यावेळी विरोधी पक्षांना पूर्ण बहुमत देत काँग्रेसचा दारुण पराभव केला होता. यावेळी विरोधकांनी घटनेच्या संरक्षणाच मुद्दा प्रमुख बनविला होता. पण लोकांनी त्यांचा पराभव करुन आम्हाला पुन्हा सत्ता दिली. यावरुन लोकांचा घटनेच्या संरक्षणाच्या संदर्भात आमच्यावरच अधिक विश्वास आहे, हे सिद्ध होते. 2004 मध्ये काँग्रेसप्रणित सरकार पुन्हा स्थापन झाले. तेव्हा सोनिया गांधींच्या नेतृत्वात राष्ट्रीय सल्लागार समिती नावाचे एक घटनाबाह्या सत्ता केंद्र स्थापन करण्यात आले होते. तो घटनेचा सर्वात मोठा अवमानच होता. आज हीच काँग्रेस दांभिकपणे आम्हाला घटनेचे धडे देत आहे, असा घणाघात त्यांनी केला.

आता विरोधक गप्प का?

पश्चिम बंगालमध्ये एका महिलेला भर रस्त्यात काठीने मारहाण करण्यात आली. या प्रसंगाचा व्हिडीओ प्रसिद्ध झाला आहे. तथापि, एरवी महिलांच्या सुरक्षेच्या नावाने कंठशोष करणारे विरोधक आज या मुद्द्यावर गप्प का आहेत, असा प्रश्न त्यांनी विचारला. विरोधकांना महिलांच्या सुरक्षेसंबंधी वाटणारी चिंता ही त्यांचे नवे नाटक आहे, अशीही प्रखर टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

मणिपूरवर राजकारण नको

मणिपूरमधील स्थिती आता सामान्य होत आहे. आमच्या सरकारने तणाव निवळण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. संशयितांवर हजारो एफआयआर सादर करण्यात आले आहेत. मणिपूरमध्ये हिंसाचार आणि तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची ही पहिली वेळ नाही. त्यामुळे विरोधकांनी या प्रश्नाचे राजकारण करु नये. तो प्रयत्न यशस्वी होणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

आणखी 20 वर्षे आहेतच...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातले हे सरकार तिसरे नसून एक तृतियांश आहे, अशी तिरकस टिप्पणी काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केली होती. तिचाही समाचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. आमच्या सरकारने आता 10 वर्षे पूर्ण केली आहेत. ही एक तृतियांश आहेत. म्हणजे, आणखी 20 वर्षे आमचेच सरकार राहणार, असा काँग्रेसचाही विश्वास आहे, असा खोचक पलटवार त्यांनी केला.

विरोधकांचा सभात्याग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण पूर्ण होण्याआधीच विरोधकांनी सभात्याग केला. त्यामुळे राज्यसभेच अध्यक्ष जगदीप धनखड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विरोधकांकडे सत्य ऐकण्याचे धाडस नाही. त्यामुळे ते सभागृहातून पळ काढत आहेत, अशी टिप्पणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. विरोधकांची ही कृती हा राज्यसभेचा घोर अपमान आहे, अशी प्रतिक्रिया धनखड यांनी व्यक्त केली.

राज्यसभा संस्थगित

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शन प्रस्तावावरील चर्चेनंतर राज्यसभा अनिश्चित काळापर्यंत संस्थगित करण्यात आली. आता अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात राज्यसभेचे कामकाज पुन्हा होणार आहे. संसदेच्या पुढच्या अधिवेशनाचा कालावधी स्पष्ट करण्यात आलेला नाही. मात्र, केंद्र सरकारला पुढील आर्थिक वर्षासाठी संपूर्ण अर्थसंकल्प सादर करायचा असल्याने जुलैमध्येच पुन्हा संसदेचे अधिवेशन होण्याची शक्यता आहे.

राज्यसभेत गदारोळ

ड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात राज्यसभेत अडथळे आणण्याचा प्रयत्न

ड पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल, घटनेच्या पायमल्लीचा आरोप

ड देशाचा सर्वांगिण विकास हेच आमचे ध्येय असल्याचा विश्वासपूर्वक उच्चार

Advertisement
Tags :

.