‘पोगो’वरून विधानसभेत गदारोळ
विरोधक वारंवार हौदात, युरी आक्रमक : गॅझेटची प्रत फाडून फेकली हवेत,विरेश बोरकरांना मार्शलकरवी काढले बाहेर
पणजी : राज्यातील लोकांची ओळख आणि अधिकारांचे रक्षण करण्यासाठी ‘गोवेकर’ आणि ‘गोव्याची मूळ व्यक्ती’ या संज्ञा कायद्यात स्पष्टपणे परिभाषित केल्या पाहिजेत, असा ठराव सभागृहाने एकमताने मंजूर करावा, असा प्रस्ताव आमदार विरेश बोरकर यांनी काल शुक्रवारी विधानसभेत मांडला. त्यावर सभागृहात प्रचंड गदारोळ माजला. हे विधेयक मागे घेण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली असता ती बोरकर यांनी नाकारली. हे सरकार गोंयकारपणाची हत्त्या करण्यास पाहत आहे, असा आरोप केला. शेवटी सदर प्रस्ताव फेटाळण्यात आला. सर्व आमदार सभापतींच्या हौदात उतरले. त्यावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी गॅझेटची प्रत फाडून कागदे फेकून मारली. त्यावरून पुन्हा गदारोळ झाला. हा प्रकार घडताना दोन्ही गटांकडून एकमेकांना उद्देशून ’शेम शेम’ च्या घोषणा देण्यात आल्या.
बोरकरना काढले बाहेर
त्यानंतर सर्वजण आपल्या आसनाकडे गेले व बोरकर पुन्हा बोलू लागले असता आमदार नीलेश काब्राल यांनी त्यांना रोखण्याचे प्रयत्न केले. त्यावरून दोघांमध्येही एकमेकांवर आरोप करण्यात आले. अशाप्रकारे आपणास बोलूच दिले जात नसल्याचा आरोप करत बोरकर पुन्हा हौदाच्या दिशेने धावले. तेव्हा सभापती रमेश तवडकर यांनी त्यांना समजावणीच्या सूरात इशारा दिला. तरीही ते ऐकण्यास तयार नसल्याचे पाहून सभापतींनी मार्शलकरवी त्यांना सभागृहातून बाहेर काढले.
तर गोमंकीय हरवणार
त्यावेळी बोलताना बोरकर यांनी, आपण मांडलेला ठराव हा वैयक्तिक फायद्यासाठी नसून गोवा आणि गोमंतकीयांच्या हितासाठी आहे, भावी पिढ्यांच्या रक्षणासाठी, संरक्षणासाठी आहे, असे सांगितले. अन्यथा सध्या जे गोमंतकीय मोठ्या प्रमाणात गोव्याबाहेर जात आहेत, ते प्रमाण अधिकच वाढेल व एके दिवशी गोव्यातून गोमंतकीयच हरवला जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
तत्पूर्वी सभापतींनी बोरकर यांना ठराव मागे घेण्याची विनंती केली. मात्र त्यांनी ती नाकारली. त्यामुळे ठराव मतदानास घालण्यात आला व अखेर फेटाळण्यात आला. बोरकर यांनी बोलताना सरकारला कायद्याद्वारे व्याख्या स्पष्ट करण्याची विनंती केली. कारण ’गोमंतकीय’ ही आपली ओळख जपण्याची गरज आसून, सध्या गोव्यातील कोण पात्र आहेत यावर प्रश्नचिन्ह कायम आहे, असे सांगितले.
मतविभाजन सुरू असताना सभापतींनी ठराव फेटाळण्याचा प्रस्ताव मांडला. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या वर्तनावर टीका केली. सध्याचे कायदे हे गोव्यातील किंवा मूळ गोमंतकीय कोण पात्र आहेत, हे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे, असे ते म्हणाले. विशेष म्हणजे आपचे आमदार वेंझी व्हिएगश यांनीही या ठरावास पाठिंबा दर्शविला.