‘राष्ट्रपत्नी’ विधानावरून संसदेत गदारोळ
काँगेसचे अधीर रंजन चौधरी टीकेच्या भोवऱयात, स्मृती इराणी-सोनिया गांधी यांच्यात शब्दद्वंद्व
नवी दिल्ली/ वृत्तसंस्था
राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांचा उल्लेख ‘राष्ट्रपत्नी’ असा केल्याने काँगेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. हे विधान त्यांनी गुरुवारी बोलताना जाहीररित्या केले. संसद ते सोशल मीडिया अशा सर्वच माध्यमांमधून त्यांना झोडपण्यात येत असून त्यांच्या या बेजबाबदार आणि बेदरकार विधानामुळे काँगेस पक्षाचीही कोंडी झाली आहे.
अखेर परिस्थिती हाताबाहेर चालल्यामुळे जागे झालेल्या चौधरी यांनी राष्ट्रपतींची भेट मागितली असून व्यक्तीशः क्षमायाचना करणार असल्याची घोषणा केली. तरीही गदारोळ थांबला नाही. लोकसभेत सोनिया गांधींनी सत्ताधारी पक्षाच्या बाकांजवळ जाऊन स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. तथापि, त्यांच्यात आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यात जोरदार वादावादी झाल्याचे पहावयास मिळाले.
हा जिव्हाप्रमाद
आपण चुकून असे विधान केले. तो आपला जिव्हाप्रमाद (स्लिप ऑफ टंग) होता, अशी सारवासारवी करण्याचा प्रयत्न चौधरी यांनी केला. संध्याकाळी त्यांनी राष्ट्रपती भवनात फोन करून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे भेटीची वेळ मागितली. त्यांना वेळ देण्यात आली की नाही, यासंबंधी संदिग्धता आहे. मात्र, या विधानामुळे भाजपच्या हाती आयतेच कोलित लागल्याचे दिसून येत आहे.
हा राष्ट्रपतींचा अपमान
द्रौपदी मुर्मू यांना ‘राष्ट्रपत्नी’ असे संबोधले गेल्याने चौधरी यांनी त्यांचा अपमान केला आहे. यासंबंधात काँगेस नेत्या सोनिया गांधी यांनी देशाकडे क्षमायाचना केली पाहिजे. हे विधान जरी चौधरी यांच्या तोंडून निघाले असले तरी त्यांच्या बोलवित्या धनी सोनिया गांधी याच आहेत. त्यामुळे त्यांनी जबाबदारी स्वीकारावयास हवी अशी आग्रही भूमिका भाजप संसद सदस्यांनी घेतली.
इराणींचे लोकसभेत भाषण
काँगेस, सोनिया गांधी आणि अधीर रंजन चौधरी यांच्यावर चौफेर टीका करणारे भाषण स्मृती इराणी यांनी लोकसभेत केले. राष्ट्रपतींचा अपमान जाणूनबुजून करण्यात आला आहे. पक्षाच्या प्रमुख नेत्या या नात्याने सोनिया गांधी याला जबाबदार आहेत. केवळ राष्ट्रपतींचाच नव्हे, तर देशातील समस्त महिला समाजाचीही ही टिंगलटवाळी आहे. सोनिया गांधी यांनी पूर्ण देशाची क्षमा मागितली पाहिजे. केवळ चौधरी यांनी खेद व्यक्त करून भागणार नाही. भाजप हा मुद्दा सहजासहजी विसरणार नाही, असा इशारा इराणी यांनी दिला.
‘मॅडम’ना मध्ये ओढू नका
चूक मी केली आहे. हवे तर मला फाशी द्या, पण आमच्या पक्षनेत्या सोनिया गांधी यांना या प्रकरणात ओढू नका अशी मागणी अधीर रंजन चौधरी यांनी केली. माझ्या विधानात त्यांचा कोणताही संबंध नाही. मी चुकून हे विधान केले. तुम्ही राईचा पर्वत करीत आहात. मी राष्ट्रपतींकडे जाऊन क्षमा मागणार आहे. मात्र, तुमच्यासारख्या पाखंडी लोकांकडे मी क्षमायाचना करणार नाही, असा उलट दम देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पण त्यामुळे वातावरण आणखी भडकले.
गांधींनी उद्धटपणा केल्याचा आरोप
अधीर रंजन चौधरी यांच्या विधानावर सोनिया गांधींनी सारवासारवी केली. मात्र, ती करत असतानाही त्यांनी औद्धत्त्याचे प्रदर्शन केले असा आरोप भाजपने केला आहे. लोकसभेत स्मृती इराणींच्या जवळ जाऊन त्यांनी दमदाटी केल्याचे भाजपचे म्हणणे आहे. त्यामुळे आता भाजप आणि काँगेस यांच्यात निर्माण झालेला वाद लवकर मिटण्याची चिन्हे नाहीत, असे बोलले जाते.
स्मृती इराणींशी ‘गट्टी फू’
सोनिया गांधी सत्ताधारी बाकांकडे जात असताना स्मृती इराणींनी त्याला आक्षेप घेतला. त्यामुळे त्यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. सोनिया गांधी यांनी तुम्ही माझ्याशी बोलू नका, असे इराणींना दरडावून सांगितले, असा आरोप आहे. शाळेत विद्यार्थिनी भांडतात तसे भांडण त्यांच्यात झाले असेही बोलले जात आहे.
हात झटकण्याचा प्रयत्न
- वादग्रस्त विधानाचे परिणाम पाहून काँगेसचा हात झटकण्याचा प्रयत्न
- राष्ट्रपती भवनात जाऊन क्षमा याचना करण्याची चौधरी यांची तयारी
- लोकसभा व राज्यसभेत प्रचंड गदारोळ, कामकाज दिवसभर स्थगित