इंडोनेशियात गदारोळ, अध्यक्षांचा चीन दौरा रद्द
खासदारांच्या वेतनवृद्धी विरोधात तीव्र निदर्शने
वृत्तसंस्था/ जकार्ता
इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबिआंतो यांनी रविवारी एससीओ शिखर परिषदेसाठी होणारा स्वत:चा चीन दौरा रद्द केला आहे. याचे कारण देशाच्या खासदारांच्या वेतन वृद्धीच्या विरोधात होत असलेली तीव्र निदर्शने आहेत. या निदर्शनांमध्ये कमीतकमी 3 जणांचा मृत्यू झाला आहे, तसेच अनेक इमारती तसेच सार्वजनिक सुविधा नष्ट झाल्या आहेत. जकार्तामध्ये उग्र निदर्शने होत असल्याने प्रबोवो यांनी स्वत:चा चीन दौरा रद्द केला आहे. प्रबोवो हे 3 सप्टेंबर रोजी दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीला 80 वर्षे झाल्यानिमित्त आयोजित होणाऱ्या ‘विजय दिन’ संचलनात सामील होणार होते.
निदर्शनांचे कारण
नोकरी आणि वेतनावरून असंतोष असताना खासदारांच्या वेतनात वाढ करण्यात आल्यावर ही निदर्शने सुरू झाली. शुक्रवारी एका पोलिसांच्या वाहनाकडून दुचाकीस्वाराला धडक देण्यात आली होती, यात या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता, यानंतर स्थिती आणखी बिघडली. अध्यक्षांनी मृत चालकाच्या परिवाराची भेट घेत संवेदना व्यक्त केल्या तसेच चौकशीचे आश्वासन दिले आहे. अध्यक्ष स्थितीवर नजर ठेवून सर्वोत्तम तोडगा काढू इच्छित आहेत. याचमुळे त्यांनी स्वत:चा दौरा रद्द करत चीन सरकारसमोर खेद व्यक्त केला असल्याचे अध्यक्षांचे प्रवक्ते प्रसेत्यो हादी यांनी सांगितले आहे.
अनेक ठिकाणी लूट
निदर्शकांनी नासडेम पक्षाचे नेत अहमद साहरोनी यांच्या घरात लूट केली आहे. साहरोनी यांनी निदर्शकांना ‘मूर्ख’ संबोधिले होते. तर हास्य कलाकार असलेले परंतु आता आमदार असलेले एको पॅट्रियो यांच्या घरावरही निदर्शकांनी हल्ला केला आहे.
क्षेत्रीय विधिमंडळ भवनाला आग
निदर्शकांनी क्षेत्रीय विधिमंडळ भवनाला आग लावल्याने तीन जणांचा मृत्यू झाला आणि कमीतकमी 5 जण जखमी झाले आहेत. जकार्तामध्sय लूटपाट आणि अनेक परिवहन सुविधांना नुकसान पोहोचविण्यात आले आहे. जकार्तामध्ये स्थिती तणावपूर्ण असल्याचे समजते. अध्यक्षांनी ‘अराजक कृत्यां’चय विरोधात कठोर कारवाईचा आदेश दिला आहे. नागरिकांना अभिव्यक्ती आणि एकत्र येण्याचा अधिकार आहे, परंतु निदर्शक कायद्याचे उल्लंघन करत असून यात इमारती आणि पोलीस मुख्यालयांवर हल्ले सामील असल्याचे राष्ट्रीय पोलीस प्रमुख लिस्टियो सिगित प्रबोवो यांनी सांगितले