राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षांची उचलबांगडी
षडाक्षरी यांची शिमोग्याहून कोलारमध्ये बदली
बेंगळूर : राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सी. एस. षडाक्षरी यांची राज्य सरकारने उचलबांगडी केली आहे. शिमोगा येथे कर्नाटक राज्य लेखापरीक्षण आणि लेखा कार्यालयात लेखा अधीक्षक असणाऱ्या षडाक्षरी यांची कोलार जिल्ह्यातील रिक्त असणाऱ्या समाज कल्याण खात्याच्या लेखा अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. अधिकाराचा दुरुपयोग केल्याचा ठपका त्यांच्यावर असल्याने सरकारने त्यांची कोलार येथे बदली केली आहे. षडाक्षरी शिमोग्यात न राहता बेंगळूरमध्येच अधिक वेळ घालवत असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. लेखापरीक्षण-लेखा विभागात अधिक काम नसल्याने शिमोग्याऐवजी बेंगळूरमध्ये अधिक वेळ घालवतात, असा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे. ही बाब सरकारने गंभीरपणे विचारात घेतली आहे. कामाचा अधिक ताण असलेल्या समाज कल्याण खात्याच्या लेखा अधीक्षकपदी त्यांची नेमणूक केली आहे. शिमोगा जिल्हा पालकमंत्री व शिक्षणमंत्री मधू बंगारप्पा यांनी षडाक्षरी शिमोग्यातील लेखापरीक्षण कार्यालयात उपलब्ध होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. रॉयल्टी न भरता शिमोगातील अब्बलगेरे तलावातून बेकायदेशीरपणे मातीची वाहतूक करून सरकारच्या खजिन्याचे लाखो रुपयांचे नुकसान केल्याचा ठपकाही षडाक्षरी यांच्यावर आहे. याविषयी शिमोगा जिल्हा पंचायतीच्या कार्यकारी अभियंत्याने अहवाल दिला होता. त्यानुसार मंत्री मधू बंगारप्पा यांनी षडाक्षरी यांची तातडीने बदली करावी, असे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविले होते.