देशभर सुमारे 3 तास युपीआय सेवा बंद
युजर्सना व्यवहार करण्यात अडचणी : गेल्या वीस दिवसांत तिसऱ्यांदा समस्या
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशभरात शनिवारी दुपारच्या सुमारास युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच युपीआय सेवा सुमारे तीन तास बंद होती. शनिवारी सकाळी 11:30 ते दुपारी 01:00 वाजण्याच्या दरम्यान पेमेंट फेल होण्याची सर्वाधिक संख्या नोंदवली गेली. त्यानंतरही दुपारी 3:00 वाजेपर्यंत आर्थिक व्यवहार करण्यात अडचणी येत होत्या. गेल्या 20 दिवसांत व्यवहारात समस्या येण्याची ही तिसरी वेळ आहे.
वेबसाईट्स आणि ऑनलाईन सेवांची रिअल-टाईम स्थिती प्रदान करणारा प्लॅटफॉर्म डाउन डिटेक्टरच्या मते, या समस्येचा सामना करणाऱ्या सुमारे 81 टक्के लोकांना पेमेंट करण्यात समस्या येत होत्या. 17 टक्के लोकांना निधी हस्तांतरित करण्यात समस्या आल्या तर, सुमारे 2 टक्के लोकांना खरेदी करण्यात समस्या आल्या. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. तांत्रिक समस्यांमुळे युपीआय व्यवहारांमध्ये समस्या येत असल्याचे सांगण्यात आले. ‘ही समस्या सोडवण्यासाठी आम्ही काम करत आहोत आणि तुम्हाला अपडेट देत राहू. झालेल्या गैरसोयीबद्दल क्षमस्व.’ असे ‘एनपीसीआय’ने म्हटले आहे.
सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास युपीआय देव-घेव व्यवहारांमध्ये समस्या निर्माण होण्यास सुरुवात झाली. नेमकी बँकिंग व्यवहाराची वेळ सुरू झाल्यानंतरच व्यवहारांमध्ये अडचणी येऊ लागल्याने अनेकांनी यासंबंधी तक्रारीही नोंदवल्या. ही समस्या सुरू झाल्यानंतर या प्लॅटफॉर्मवर सुमारे 900 लोकांनी तक्रार नोंदवली होती. दुपारी 01:00 वाजता समस्येची तक्रार करणाऱ्यांची सर्वाधिक संख्या 2,400 होती. दुपारी अडीच वाजल्यापासून समस्या सुधारू लागली. त्यानंतर सर्व व्यवहार सुरळीत होऊ लागले.
भारतात आरटीजीएस आणि एनईएफटी पेमेंट सिस्टीमचे कामकाज आरबीआयकडे आहे. आयएमपीएस, रुपय आणि युपीआयसारख्या प्रणाली नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे (एनपीसीआय) चालवल्या जातात. सरकारने 1 जानेवारी 2020 पासून युपीआय व्यवहारांसाठी शून्य-शुल्क फ्रेमवर्क अनिवार्य केले होते.