पेन्शनधारकांची अपडेट प्रक्रिया सुरू
तलाठ्यांवर कामाची जबाबदारी : आधारकार्ड, ऑर्डर कॉपी देण्याची गरज
बेळगाव : महसूल खात्याकडून विधवा, वृद्धापवेतन (संध्या सुरक्षा), दिव्यांग वेतन घेणाऱ्या लाभार्थ्यांची ऑर्डर कॉपी व आधार कार्ड लिंक करून अपडेट करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे तलाठी व त्यांचे सहकारी गावोगावी जाऊन लाभार्थ्यांकडून पेन्शनची ऑर्डर कॉपी आणि आधार कार्ड घेत आहेत. यानंतर संबंधितांच्या मोबाईलवर ओटीपी पाठवून खात्री केली जात आहे. राज्य सरकारच्या विविध पेन्शन योजनांचा लाभ घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. काही अपात्र लाभार्थ्यांनीदेखील सरकारच्या पेन्शन योजनांचा लाभ घेतल्याचा आरोप आहे. मध्यंतरी अनेकजणांची फेरतपासणी करून पेन्शन थांबविण्यात आली होती. यानंतर देखील बहुतांश जणांनी बनावट कागदपत्राच्या आधारावर पेन्शन योजनांचा लाभ घेण्यास सुरुवात केली असल्याचे महसूल खात्याच्या निदर्शनास आले आहे.
यामुळे तहसीलदारांच्या सूचनेनुसार तलाठी आपल्या हद्दीत येणाऱ्या गावांना भेट देऊन लाभार्थ्यांकडून पेन्शनची ऑर्डर कॉपी व आधार कार्डची झेरॉक्स प्रत घेत आहेत. त्यानंतर संबंधितांच्या मोबाईलवर ओटीपी पाठवून लिंक केले जात आहे. जे लाभार्थी पात्र आहेत. केवळ त्यांना यापुढे पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे. अपात्र लाभार्थ्यांना पेन्शन योजनेपासून वगळले जाणार आहे. सोमवारी हिंडलग्याचे तलाठी मंजुनाथ टिप्पोजी व त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या हद्दीत येणाऱ्या गणेशपूर, हिंडलगा, बेनकनहळ्ळी व सावगाव गावातील लाभार्थ्यांकडून पेन्शनची ऑर्डर कॉपी आणि आधार कार्डची झेरॉक्स प्रत स्वीकारण्यास सुरुवात केली आहे.
सातबारा उताऱ्याला आधार लिंक
महसूल खात्याकडून सात बारा उताऱ्याला आधार लिंक केले जात आहे. मात्र अद्यापही बहुतांश जणांनी सात बारा उताऱ्याला आधार लिंक केलेले नाही. तशा शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्याला लिंक जोडले जात आहे. तसेच घरच्या कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर काही जणांनी वारसा करून घेतलेला नाही. तशा कुटुंबियांनादेखील वारसा करून घेण्याचे आवाहन केले आहे.