आगामी अर्थसंकल्प पर्यटन, रोजगार क्षेत्रावर भर देणारा
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे सुतोवाच
पणजी/ विशेष प्रतिनिधी
आगामी अर्थसंकल्प हा पर्यटन आणि रोजगार या क्षेत्रावर भर देणारा असेल. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यासंदर्भात सुतोवाच केला. बुधवार 26 रोजी गोव्याचा 2025-2026 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत राज्य विधानसभेत सादर करणार आहेत. अर्थसंकल्पाबाबत आपण आताच काही बोलणार नाही, परंतु गोव्याच्या पर्यटनाला बूस्ट मिळावे यासाठी आपला प्रयत्न आहे. पर्यटनातून रोजगार संधी जास्तीत जास्त गोमंतकीय युवकांना प्राप्त व्हाव्यात हे आपले उद्दिष्ट आहे. आपला अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक आणि सर्व घटकांना प्रोत्साहन व प्राधान्य देणारा आहे, मात्र पर्यटन क्षेत्रासाठी अजूनही बरेच काम करावयाचे आहे. आपण पर्यटनावर जास्त भर देणार असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रस्तुत प्रतिनिधीपाशी बोलताना स्पष्ट केले.
700 पेक्षा जास्त विरोधकांचे प्रश्न सरकारची कसोटी लागणार
दरम्यान, गोवा राज्य विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या सोमवार दि. 23 पासून सुरू होत आहे. हे अधिवेशन केवळ तीन दिवसांचे असले तरीदेखील सुमारे 700 पेक्षा जास्त प्रश्न विरोधकांनी विचारलेले आहेत आणि सरकारची कसोटी लागणार आहे. अनेक जे महत्त्वाचे विषय आहेत ते यावेळी चर्चेला येणार आहेत. त्याचबरोबर ‘कॅश फॉर जॉब’ हे प्रकरण तसेच राज्यातील कायदा व सुव्यवस्था, वाढते अपघात आणि विविध प्रकारची भ्रष्टाचाराची प्रकरणे इत्यादी चर्चेला घेतली जाणार आहेत. तीन दिवसांच्या या अधिवेशनात मुख्यमंत्री अर्थमंत्री या नात्याने सातव्यांदा अर्थसंकल्प 26 रोजी सादर करतील. या अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शन या प्रस्तावावर चर्चा होणार आहे. मात्र ही चर्चा व त्यावरील उत्तर यासाठी केवळ दोनच दिवस सोमवार, मंगळवार प्राप्त होतील. बुधवारी अर्थसंकल्प असल्यामुळे त्या दिवशी अर्थसंकल्पानंतर विशेष कामकाज होणार नाही. अधिवेशनाचा कालावधी अत्यल्प असल्यामुळे अनेक सरकारी विधेयके चर्चेविना संमत करावी लागणार आहेत.