रोमांचक सामन्यात यूपी वॉरियर्सचा सुपर ओव्हरमध्ये विजय
वृत्तसंस्था / बेंगळूर
सुपर ओव्हरपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात यूपी वॉरियर्स संघाने आरसीबीवर चार धावांनी थरारक विजय मिळविला. यूपी वॉरियर्सच्या इक्लेस्टोनची कामगिरी निर्णायक ठरली. तिलाच सामनावीराचा मान मिळाला.
या सामन्यात यूपी वॉरियर्सने नाणेफेक जिंकून आरसीबीला प्रथम फलंदाजी दिली. आरसीबीने 20 षटकात 6 बाद 180 धावा जमवित यूपी वॉरियर्सला 181 धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरादाखल खेळताना सोफी इक्लेस्टोनने शेवटच्या षटकात केलेल्या फटकेबाजीने यूपी वॉरियर्सने 20 षटकात 180 धावा जमवित हा सामना टाय केला. पंचांनी त्यानंतर सुपर ओव्हरचा अवलंब केला.
सुपर ओव्हरमध्ये यूपी वॉरियर्सने 1 बाद 8 धावा जमविल्या. आरसीबीच्या किंम गार्थने हे षटक टाकले तर हेन्री आणि हॅरिस या जोडीने या षटकात फलंदाजी केली. गार्थच्या पहिल्या व दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसरा चेंडू वाईड झाल्याने त्यांना 1 धाव मिळाली. चौथ्या चेंडूवर यूपी वॉरियर्सची फलंदाज बाद झाली. पाचव्या चेंडूवर धाव निघाली नाही. सहाव्या चेंडूवर 1 धावा मिळाली. सातवा चेंडू पुन्हा वाईड ठरला. तर या षटकातील शेवटच्या आणि आठव्या चेंडूवर 1 धाव मिळाल्याने यूपी वॉरियर्सने या सुपर ओव्हरमध्ये 1 बाद 8 धावा जमविल्या.
आरसीबीतर्फे रिचा घोष आणि स्मृती मानधना यांनी इक्लेस्टोनच्या सुपर ओव्हरमध्ये फलंदाजी केली. या षटकात इक्लेस्टोनच्या पहिल्या चेंडूवर एकही धाव मिळाली नाही. दुसऱ्या चेंडूवर 1 धाव मिळाली. तिसऱ्या चेंडू निर्धाव ठरला. चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर प्रत्येकी 1 धाव मिळाली. त्यामुळे आरसीबीने सुपर ओव्हरमध्ये बिनबाद 4 धावा जमविल्याने यूपी वॉरियर्सने हा सामना 4 धावांनी जिंकला.
तत्पूर्वी रॉयल चॅलेंजर्सच्या डावामध्ये एलीस पेरी आणि डॅनी वॅट हॉज यांनी अर्धशतके झळकविली. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 94 धावांची भागिदारी केली. कर्णधार स्मृती मानधना 6 धावांवर बाद झाल्यानंतर हॉजने 41 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 57 धावा झळकविल्या. पेरीने शेवटपर्यंत खेळीपट्टीवर राहून 56 चेंडूत 3 षटकार आणि 9 चौकारांसह नाबाद 90 धावा झळकविल्या. आरसीबीच्या इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. आरसीबीच्या डावात 6 षटकार आणि 9 चौकार नोंदविले गेले. यूपी वॉरियर्सतर्फे हेन्री, दीप्ती शर्मा, मॅकग्रा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला तर तीन फलंदाज धावचित झाले. आरसीबीने पहिल्या 6 षटकात 42 धावा जमविताना 1 गडी गमविला. पेरीने 36 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. आरसीबीचे अर्धशतक 48 चेंडूत शतक 78 चेंडूत तर दीड शतक 105 चेंडूत नोंदविले गेले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना यूपी वॉरियर्सच्या डावामध्ये सोफी इक्लेस्टोनची खेळी सर्वोत्तम ठरली. तिने 19 चेंडूत 4 षटकार आणि 1 चौकारांसह 33 धावा जमवित ती डावातील शेवटच्या चेंडूवर धावचित झाली. किरण नवगिरेने 12 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 24, वृंदाने 10 चेंडूत 2 चौकारांसह 14, कर्णधार दीप्ती शर्माने 13 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 25, श्वेता सेहरावतने 25 चेंडूत 4 चौकारांसह 31, छेत्रीने 11 चेंडूत 2 चौकारांसह 14 तर सायमा ठाकुरने 8 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारांसह 14 धावा केल्या. यूपी वॉरियर्सच्या डावात 7 षटकार आणि 19 चौकार नोंदविले गेले. आरसीबीतर्फे स्नेह राणाने 27 धावांत 3 तर रेणूका सिंग आणि गार्थ यांनी प्रत्येकी 2 आणि पेरीने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : आरसीबी 20 षटकात 6 बाद 180 (एलीस पेरी नाबाद 90, डॅनी वॅट हॉज 57, अवांतर 5, हेन्री, शर्मा, मॅकग्रा प्रत्येकी 1 बळी), यूपी वॉरियर्स 20 षटकात सर्वबाद 180 (इक्लेस्टोन 33, सेहरावत 31, शर्मा 25, नवगिरे 24, वृंदा 14, छेत्री 14, ठाकुर 14, अवांतर 7, स्नेह राणा 3-25, रेणूकासिंग ठाकुर व गार्थ प्रत्येकी 2 बळी, एलीस पेरी 1-10)
सुपर ओव्हर
यूपी वॉरियर्स 1 बाद 8
आरसीबी बिनबाद 4.