अनगोळ संभाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण अनधिकृत
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची माहिती : लवकरच अधिकृतरीत्या लोकार्पण करण्याचे ग्रामस्थांना आश्वासन
बेळगाव : अनगोळ येथील धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण शिष्टाचाराचे उल्लंघन करत अनधिकृतपणे करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन महिन्यांत सर्व प्रक्रिया पूर्ण करून शिष्टाचाराप्रमाणे महानगरपालिकेच्या पुढाकारातून संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे अधिकृतपणे लोकार्पण केले जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी अनगोळ ग्रामस्थांना दिले. सोमवार दि. 6 रोजी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिले.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्यासोबत सोमवारी अनगोळ ग्रामस्थांची बैठक पार पडली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकारी रोशन म्हणाले, अनगोळ येथील धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळा लोकार्पणावरून शनिवारी आपण स्वत: पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत अनगोळला भेट देऊन पाहणी केली होती. त्यावेळी तेथे उपस्थित नागरिकांशी चर्चा करण्यात आली. शिष्टाचाराचे पालन करत 40 गल्ल्यांतील किमान चार जणांना यामध्ये समाविष्ट करून घेऊन मोठ्या प्रमाणात योग्यवेळी लोकार्पण करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. पण रविवारी करण्यात आलेला लोकार्पण सोहळा शिष्टाचाराप्रमाणे करण्यात आलेला नसून तो अनधिकृत आहे, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
त्यामुळे येत्या दोन-तीन महिन्यांत सर्व प्रक्रिया पूर्ण करून मनपाच्या पुढाकारातून शिष्टाचाराप्रमाणे लोकार्पण केले जाईल. सोहळ्यात सर्वपक्षांच्या, तसेच विविध जाती-धर्मांच्या लोकांना समाविष्ट करून घेऊन कार्यक्रम झाला पाहिजे, अशी मागणी लोकांची आहे. चौथऱ्याच्या आवारातील लिफ्ट व अन्य काही कामे शिल्लक असल्याने ती पूर्ण झाल्यानंतर लोकार्पणाचे कार्य हाती घेतले जाईल, असे सांगितले होते. दोन वर्षांपूर्वी महापालिकेत ठराव पास करून सदर प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला
होता. तसेच या सोहळ्यासाठी पोलीस आयुक्तांकडून परवानगी घेण्यात आल्याचेही मला सांगण्यात आले. सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार सरकारकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाला जिल्हाधिकाऱ्यांचे अनुमोदन असणे गरजेचे आहे. एखाद्या सार्वजनिक ठिकाणी पुतळा उभारत असताना तेथील रस्ता, सर्कल आणि स्थळाला कोणत्याही प्रकारे धक्का पोहोचणार नाही, यासाठी सदर प्रस्ताव नाकारत सरकारने पुन्हा बेळगाव जिल्हा प्रशासनाकडे पाठविला होता. सदर प्रस्ताव पुन्हा सरकारकडे पाठवून त्याला मंजुरी मिळावी, यासाठी वेळ मागितला होता. पण रविवारी सायंकाळी अनधिकृतरीत्या धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. त्याला सरकार आणि जिल्हा प्रशासनाने कोणत्याही प्रकारची परवानगी दिलेली नाही, असे जिल्हाधिकारी रोशन म्हणाले. पण दोन दिवसांपूर्वी केलेल्या आवाहनाला लोकांनी प्रतिसाद दिल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. त्यामुळे येत्या दोन ते तीन महिन्यांत मनपाच्या पुढाकारातून शिष्टाचाराप्रमाणे अधिकृतरीत्या पुतळ्याचे लोकार्पण केले जाईल, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले.