For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कर्जाच्या आमिषाने 19 कोटी 35 लाखांचा गंडा

11:51 AM Jan 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
कर्जाच्या आमिषाने 19 कोटी 35 लाखांचा गंडा
Advertisement

शहर परिसरातील 7,707 जणांची फसवणूक

Advertisement

बेळगाव : फायनान्समधून कर्ज देण्यासह त्यावर सबसिडी देतो आणि तुमच्या कर्जाचे हप्ते देखील आम्हीच भरतो, असे सांगून 7 हजार 707 जणांची सुमारे 19 कोटी 35 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे खळबळजनक प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी मंगळवार दि. 7 रोजी माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अश्विनी होळ्याप्पा दड्डी, तिचा पती होळ्याप्पा फकिरप्पा दड्डी, मुलगी शेवंता आणि प्रियांका अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी शेखा कन्नप्पा हंचिनमनी (रा. सोनट्टी ता. बेळगाव) यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार पोलिसांनी वरील चौघा जणांविरोधात गुन्हा दाखल करून घेऊन तपास चालविला आहे. महिन्याभरापूर्वी काकती पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या हालभावी गावातदेखील एका दाम्पत्याने अशाच प्रकारे सुमारे दोन हजार महिलांना कर्ज देऊन त्यापैकी 50 टक्के रक्कम आपल्याकडे ठेवून घेतली होती. तसेच कर्जाचे हप्तेही आपणच भरतो असे सांगत काही दिवस हप्ते भरले.

त्यानंतर हप्ते भरण्यास चालढकल केल्याने याप्रकरणी परिसरातील महिलांनी संबंधितांच्या घराला घेराव घालण्यासह काकती पोलीस ठाण्यालाही घेराव घातला होता. तसेच पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनाही काँग्रेस भवनात घेराव घालून न्याय देण्याची मागणी केली होती. त्यामुळे याप्रकरणी काकती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच अशाच प्रकारची दुसरी घटना आता माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. दड्डी कुटुंबीय यमनापूर येथे वाल्मिकी महिला स्वसाहाय्य संघ चालवित होते. त्या माध्यमातून ते गरजू महिलांना फायनान्समधून कर्ज देतो असे सांगून आपल्या जाळ्यात ओढत होते. कर्जावर सबसिडी देऊन सदर कर्जाचे हप्तेही आपणच भरतो असे सांगत होते. मात्र प्रत्यक्षात त्यांनी कर्जाचे हप्ते भरले नाहीत. अशारितीने त्यांनी 7 हजार 707 जणांची फसवणूक केली असून त्यांच्यावर 19 कोटी 35 लाख 35 हजार 636 रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप फिर्यादी शेखा हंचिनमनी यांनी केला आहे. त्यानुसार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून घेऊन तपास चालविला आहे. पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची पुढील तपास करीत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.