For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

बंधनापासूनी उकलल्या गांठी

06:40 AM Mar 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
बंधनापासूनी उकलल्या गांठी

अध्याय एकतिसावा

Advertisement

नाथमहाराज हरीच्या कीर्तनाचे महत्त्व सांगत आहेत. ते म्हणाले, हरीच्या मनात भरण्यासाठी हरीकीर्तनासारखे सहजसोपे साधन नाही. कीर्तन करणारे निरपेक्ष असल्याने ते निभावत असलेल्या कर्तव्यकर्मातून त्यांना कोणतीच अपेक्षा नसते. त्यामुळे त्यांच्या खात्यावर त्यातून पुण्य जमा होत नाही. कृष्णाच्या कीर्तनाने त्यांची उजळलेली स्थिती कल्पांतापर्यंत मळू शकत नाही.

हरिकीर्तिकीर्तनाचा कल्लोळ केल्यामुळे ज्याची निष्कामदशा उजळलेली असते. त्याचा देह त्याने कर्मे केली तरी विटाळला जात नाही. त्यांनी हरीच्या अत्यंत जवळचे स्थान प्राप्त केलेले असल्याने त्यांना स्वत:चे असे काही कर्म उरलेले नसते. त्यातून त्यांचे जे काही कर्म असेल ते स्वत: पुरुषोत्तम करत असतो. त्यासाठी त्यांच्या देहाच्या हालचाली पुरुषोत्तम स्वत:च घडवून आणत असल्याने आपण करत असलेले कर्म चांगले आहे की वाईट ह्याचे त्यांना भानही नसते. त्यामुळे त्यांच्या अलिप्त स्थितीला कसलीही बाधा म्हणून येत नाही.

Advertisement

ह्याउलट अभक्तांची स्थिती असते. ते स्वत:ला कर्ते समजत असल्याने त्यांना मिळालेल्या कर्मस्वातंत्र्याचा उपयोग करून घेऊन ते त्यांच्या इच्छेनुरूप कर्म करण्याचा प्रयत्न करतात आणि कर्मफलाच्या अपेक्षेने पापपुण्याच्या बंधनात अडकतात. हेच बंधन त्यांच्या पुनर्जन्माला कारणीभूत होते. भक्त कर्मबंधनात अडकत नाहीत तर अभक्त तेच कर्म करून बंधनात अडकतात. ह्याचे कारण म्हणजे मी हे कर्म करतोय असा अहंकार अभक्तांना वाटत असतो.

Advertisement

भक्त श्रीकृष्णाच्या कीर्तनात मग्न असल्याने त्यांचा अहंकार मावळलेला असतो पण हरिकीर्तनाशिवाय माझा अहंकार मीच घालवून टाकीन असा कुणी प्रयत्न करू गेल्यास ते शक्य तर होतच नाही. उलट आहे तो अहंकार नागासारखा फणा काढून माणसाला छळू लागतो पण जे हरीकीर्तन आवडीने करून त्यात श्रीकृष्णाच्या कीर्तीचे वर्णन करतात त्यांचा अहंकार मात्र सहजी नाहीसा होतो. ही गोष्ट सर्वांनी आपल्या मनावर कोरून ठेवावी आणि हरीकीर्तनाची संगत धरावी. ह्या कीर्तन करण्याने वा श्रवणाने बहुतेकांचे संसारातील येणेजाणे श्रीकृष्णाने बंद केले आहे. ज्याला कृष्णकीर्तिकीर्तनाची गोडी लागते त्याचा अहंकाराचा बांध श्रीकृष्ण फोडून टाकतो. त्यामुळे त्यांची पुढील आध्यात्मिक प्रगती गतीने होत राहते. म्हणून कृष्णकीर्तिचे वर्णन करणारी कीर्तन भक्ती करून ‘कृष्णपदवी’ स्वत:च मिळवावी.

नाथमहाराज पुढे सांगतात, जगाचा उद्धार करण्यासाठी स्वत:ची कीर्ती श्रीकृष्णाने सर्वदूर पसरवली आहे हे भक्तांच्या लक्षात यावे म्हणून श्रीकृष्णाच्या जन्मापासून अंतापर्यंतचे परमाद्भुत अशा श्रीकृष्ण चरित्राचे मी सविस्तर वर्णन केले ते केवळ परमामृत आहे. नाथ महाराजांनी तर ह्याची प्रचीती घेतली होतीच तीच बाब तुकाराम महाराजही त्यांच्या अभंगातून सांगतात. ते म्हणतात,

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल।

करावा विठ्ठल जीवभाव ।1।

येणें सोसें मन जालें हांवभरी ।

परती माघारीं घेत नाहीं ।2।

बंधनापासूनि उकलल्या गांठी ।

देतां आली मिठी सावकाशें ।3।

तुका म्हणे देह भारिला विठ्ठलें ।

कामक्रोधें केलें घर रीते ।4।

विठ्ठलाच्या भजनात महाराज एव्हढे रंगून गेले आहेत की, कितीही केले तरी त्यांची भजनाची हाव काही कमी होत नाही. त्यांच्या बंधनाच्या गाठी आता उकललेल्या आहेत आणि देह विठ्ठलाने भारलेला असल्याने काम आणि क्रोध दोघांनीही तेथून पळ काढलेला आहे. ज्याचा काम आणि क्रोध नाहीसा झालेला असतो त्याला त्याच्या आत्मस्वरूपाचा विसर कधीच पडत नाही. आपण देह नसून आत्मा आहोत हे लक्षात आले की, देहाच्या पापपुण्याचे बंधन नष्ट होते. हे सर्व ईश्वराच्या कीर्तनात, भजनात रंगून गेल्यामुळे साध्य होते.

क्रमश:

Advertisement
Tags :
×

.