लहरी हवामानाचा द्राक्षबागांना फटका
सांगली :
गेल्या चार पाच दिवसांपासून सातत्याने पडणारे धुके, ढगाळ वातावरण आणि काही भागात झालेला पाऊस यामुळे द्राक्षबागामध्ये अळी, डाऊन्या यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे आधीच अडचणीत आलेला द्राक्षबागायतदार हबकला आहे. त्याचबरोबर या विचित्र वातावरणाचा रब्बी हंगामातील पिकांवरही परिणाम होणार असल्याची भिती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील तासगाव, खानापूरसह अन्य तालुक्यातील शेतकरी यामुळे हबकला आहे.
शेतकऱ्यांना आर्थिक बळकटी देणारी द्राक्षशेती गेल्या पाच ते सात वर्षापासून अडचणीत आहे. कोरोना महामारीपासून तर जिल्हयातील शेकडो एकर द्राक्षबागांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ आली आहे. कधी कडक उन्हाळा, कधी अतिपाऊस, तर कधी अचानक बदलणारे वातावरण अशा बिकट स्थितीचा परिणाम द्राक्षबागांवर होत आहे. किटकनाशके, खतांचे वाढलेले दर, मजूरी आणि इंधनवाढीमुळे वाढलेला उत्पादन खर्च आणि द्राक्षाचे पडणारे दर याचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो आहे.
यावर्षी तर सहा ते सात महिने सातत्याने पाऊस पडला. त्यामुळे द्राक्षवेलींना पुरेसा सूर्यप्रकाश मिळाला नाही. अतिपावसामुळे पांढरी मुळी सुटली नाही. परिणामी काही परिपक्व झाली नाही. साहजिकच फळछाटणीनंतर वेलींना द्राक्षघडांचे प्रमाण अत्यल्प आहे. घडच पडले नसल्याने काही शेतकऱ्यांवर यावेळीही द्राक्षबागा सोडून देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे केलेला लाखोंचा खर्च वाया गेला आहे. ज्या बागा वाचल्या. त्या शेतकऱ्यांना आता ढगाळ आणि पावसाळी वातावरणामुळे डाऊनी, किड रोगाचा सामना करावा लागत आहे. तर द्राक्ष विक्रीसाठी तयार झालेल्या शेतकऱ्यांना घडकुजव्याची भिती निर्माण झाली आहे. एकूणच निसर्गाच्या या लहरीपणामुळे द्राक्षउत्पादक शेतकरी हबकला आहे. महागड्या औषधांचा मारा द्राक्षबागांवर सुरू आहे.
रब्बीवरही परिणाम
सकाळी दाट धुके, दिवसभर कडक उन आणि रात्री, पहाटेच्या वेळी पाऊस अशा विचित्र वातावरणाचा परिणाम रब्बी पिकांच्या वाढीवरही होण्याची शक्यता आहे. त्याचा फटका रब्बीच्या उत्पादनावर होणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.