‘तरूण भारत’ने सामान्यांना लढण्याचे बळ दिले
सांगली :
अनेक दैनिकांचे विविध धोरण असते, पण ‘तरूण भारत’ संवादने मात्र नेहमी अन्यायाविरूध्द लढणाऱ्या सामान्य माणसांना बळ देण्याचे काम केले. सीमाभागातील मराठी बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे काम तरूणभारत पहिल्यापासून करत आहे. त्यामुळे तरूणभारत संवादबद्दल लोकांच्या मनात वेगळा ठसा निर्माण झाला आहे. हे वेगळेपणच सांगलीकरांना भावते, असे प्रतिपादन सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी केले.
वाचकांशी किंमतीपलिकडचे नाते जपणाऱ्या आणि सीमालढ्यातील अग्रेसर दैनिक म्हणून नावलौकिक मिळविलेल्या तरूण भारत संवादच्या सांगली आवृत्तीचा 32 वा वर्धापन दिन बुधवारी 25 डिसेंबर रोजी कोल्हापूर रोडवरील दैवज्ञ भवन येथे साजरा करण्यात आला.
या वर्धापन दिनानिमित्त ‘व्हिजन महाराष्ट्र’ या विषयावरील दर्जेदार पुरवणीचे औपचारिक प्रकाशन करण्यात आले. यावेळी आमदार इद्रीस नायकवडी, विट्याचे माजी आमदार सदाशिव पाटील, तरूण भारतचे संपादक मंगेश मंत्री, विभागीय संपादक डॉ. श्रीरंग गायकवाड, सीएफओ उदय खाडिलकर, जाहिरात व्यवस्थापक संजीव दाळींबकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
काही स्नेहबंध इतके अतूट असतात, जसे ह्द्यासोबत त्याची स्पंदने, तरूणभारत संवादचेही असेच आहे. वाचकांसोबत असणारे त्यांचे अतूट नाते असेच आहे. सांगलीत 32 वर्षापूर्वी तरूणभारतचे आगमन झाले. नाती निर्माण झाली. या मधुर वाटचालीची 32 वर्ष कशी पार पडली, कळलंच नाही. या विश्वासाच्या वाटचालीचा हा 32 वा वर्धापन सोहळा साजरा करण्यात आला.
तरूण भारत संवादचे समूह सल्लागार संपादक किरण ठाकुर, कार्यकारी संचालक प्रसाद ठाकुर, संचालक सौ. सई ठाकुर-बिजलानी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला. 104 वर्षापूर्वी तरूणभारत संवादची मुहूर्तमेढ स्व. बाबुराव ठाकुर यांनी रोवली. तरूणभारत हा महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यातून एकाचवेळी नऊ आवृत्तीत प्रसिध्द करत आहे. गेल्या 104 वर्षापासून वाचकांशी असणारे नाते सातत्याने तरूणभारत संवादने घट्ट केले आहे. आपुलकी आणि आपलेपणा जपणारे दैनिक म्हणून तरूणभारतची जनमानसात प्रतिमा आहे.
आमदार इद्रिस नायकवडी म्हणाले, सांगलीच्या मातीशी नाळ जुळलेल्या आणि वाचकांशी बांधिलकी जपणाऱ्या तरूणभारतने अल्पावधीतच जिल्ह्याचे मुखपत्र म्हणून आपला नावलौकिक मिळविला आहे. वस्तुनिष्ठ वृत्तांकन आणि रोखठोक विश्लेषणाव्दारे समाजात अढळ स्थान निर्माण केले आहे. तरूणभारतने जिल्ह्यातील अनेक प्रश्नांना वाचा फोडली आहे. प्रश्नांशी भिडणे आणि त्याची तड लावणे हे काम अखंडपणे सुरू आहे. वाचकांशी किमंतीपलिकडेले नातं जपणाऱ्या या दैनिकांनी स्वत:ची एक वैशिष्ठ्या निर्माण केले आहे आणि ती घेण्याजोगी आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.
तरूणभारत संवादने 48 पानांची ‘व्हिजन महाराष्ट्र’ ही पुरवणी प्रकाशित केली. या पुरवणीचे औपचारिक प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक संपादक मंगेश मंत्री यांनी केले. त्यावेळी ते म्हणाले, तरूण भारत संवाद 32 वर्षापुर्वी सांगलीत आला आणि सांगलीचा होवून बसला. सांगलीच्या प्रत्येक प्रश्नाला तड लावण्याचे काम त्यांने 32 वर्ष सुरू ठेवले आहे. यापुढील काळातही ते तसेच सुरू ठेवण्यात येणार आहे. वारणा ते चडचण आणि कडेगाव ते म्हैशाळ या विस्तीर्ण अशा सांगली जिल्ह्यातील प्रत्येक कानाकोपऱ्यांतील बातमी वाचकापर्यंत पोहचवण्याचे काम तरूणभारत संवाद प्रामाणिकपणे करत आहे. महापूर असो दुष्काळ असो तरूणभारतने ही आपली जबाबदारी समजून काम केले आहे. त्यामुळे तरूणभारतवर लोकांचे जिवापाड प्रेम आहे. हे प्रेम वर्धापन दिनादिवशी येणाऱ्या वाचकांच्या भेटीगाठीतून पुढे येत असल्याचेही स्पष्ट केले. सूत्रसंचालन विजय कडणे यांनी केले. आभार शहर प्रतिनिधी विनायक जाधव यांनी मानले. या स्नेहमेळाव्याला वाचकांचा मोठ्याप्रमाणात प्रतिसाद लाभला. तसेच त्यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षावही करण्यात आला.
पर्यावरणपूरक स्वागत
तरूणभारत संवादने पाहुण्याचे स्वागत विविध प्रकारचे वृक्ष देवून केले. सध्या पर्यावरणाची समस्या निर्माण होत आहे. ही समस्या प्रत्येकांनी आपल्यापरीने सोडवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे याच उद्देशाने सर्व पाहुण्यांचे स्वागत वृक्ष भेट देऊन करण्यात आले.