अवकाळी पावसाची जोरदार सलामी
जोरदार सोसाट्याचा वारा : मेघगर्जनेसह शहरासह ग्रामीण भागात पावसाची हजेरी, बाजारपेठेतील सखल भागात तुंबले पाणी
बेळगाव : अवकाळी पावसाने सोमवारी सायंकाळी शहर परिसर आणि ग्रामीण भागात जोरदार हजेरी लावली. मेघगर्जना करत वादळी वाऱ्यासह पावसाने झोपडून काढल्याने गेल्या काही दिवसापासून उष्मामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. तसेच हवेत कमालीचा गारठा निर्माण झाला असून शहरातील मुख्य बाजारपेठेतील सखल भागात पाणी तुंबले. गणपत गल्ली, भेंडीबाजारसह मारुती गल्लीत गटारीतील सांडपाणी रस्त्यावर येण्यासह कांदा मार्केटमध्ये पाणी तुंबले होते. यंदा फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच उष्णतेत प्रचंड वाढ झाली आहे.
वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असून उष्माघाताचा इशारादेखील हवामान खात्याने दिला आहे. त्यातच अवकाळी पावसाची चिन्हे दिसून येत होती. मात्र प्रत्यक्षात पाऊस होत नसल्याने वातावरणात उष्मा निर्माण झाल्याने मानवासह, पशु पक्ष्यांचा जीवदेखील कासावीस होत आहे. आठ दिवसापूर्वी शहर उपनगरासह ग्रामीण भागात काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. मात्र त्यानंतर ढगाळ वातावरण निर्माण होत होते पण प्रत्यक्षात पावसाने ओढ दिली. परिणामी दिवसा तसेच रात्रीच्यावेळी नागरिकांना फॅन, कुलर, एसीचा आसरा घ्यावा लागला. तरीदेखील उष्मा असह्या बनला आहे.
त्याचबरोबर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयातून दररोज एक ते दीड फूट पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. रविवारी रात्री 10.30 ते 11 च्या दरम्यान शहर व ग्रामीण भागात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. मात्र समाधानकारक पाऊस न झाल्याने पुन्हा उष्णतेत वाढ झाली आहे. सोमवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण होण्यासह उष्मात वाढ झाली होती. त्यामुळे दुपारनंतर पाऊस होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र सायंकाळी 5 नंतर विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शहरासह ग्रामीण भागात जोरदार हजेरी लावली.
जवळजवळ तासभर मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. शहरातील गटारींची स्वच्छता न करण्यात आल्याने पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला. त्यामुळे गणपत गल्ली, मारुती गल्ली आदी ठिकाणी गटारीतील सांडपाणी रस्त्यावरून वाहत होते. घाण तसेच केरकचरा रस्त्यावर पडल्याने घाणीतून शहरवासियांना वाट शोधावी लागली. तसेच परिसरात दुर्गंधीही पसरली होती. रविवार पेठेतील कांदा मार्केटमध्येही पावसाचे पाणी तुंबल्याने गैरसोय झाली. त्या ठिकाणचे भाजी विक्रेत्यांना पावसाच्या पाण्यात थांबून व्यवसाय करावा लागला. तसेच शहर व उपनगरातील सखल भागात पावसाचे पाणी तुंबले होते. मात्र गेल्या काही दिवसापासून हुलकावणी देणाऱ्या अवकाळी पावसाने सोमवारी जोरदार सलामी दिल्याने गेल्या काही दिवसापासून निर्माण झालेला उकाडा कमी झाला आहे. तसेच हवेतही गारठा निर्माण झाला आहे.
अवकाळीमुळे दाणादाण...
यंदाच्या पहिल्याच अवकाळी पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात दाणादाण उडाली. पावसाळ्यापूर्वी शहर आणि उपनगरातील नाल्यांसह गटारींची स्वच्छता करण्यात न आल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहत होते. तसेच गटारीतील घाण व केरकचरा रस्त्यावर येऊन पडल्याने महापालिकेचे पितळ उघडे पडले आहे. दरवर्षी नाले व गटारी सफाईकडे दुर्लक्ष करणाऱ्या महापालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात वादळी वाऱ्यामुळे विज खांब कोसळले आहेत. त्यामुळे काही गावातील वीजपुरवठा खंडित झाला असून सोसाट्याचा वाऱ्यामुळे आंबा व काजू पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
स्टेशनरी दुकानात शिरले सांडपाणी
गणेशपूर गल्ली, शहापूर यावेळी एका स्टेशनरी दुकानात पावसाचे पाणी शिरले होते. तेथे नव्याने बांधण्यात येत असलेल्या अपार्टमेंटचे बांधकाम साहित्य गटारीत पडले असल्याने गटारीतील सांडपाणी स्टेशनरी दुकानात शिरून नुकसान झाले. घटनास्थळी नगरसेवक रवी साळुंखे यांनी भेट देवून पाहणी केली.
गांधीनगर ब्रिजखाली गुडघाभर पाणी 
मुसळधार पावसामुळे बेळगाव-बागलकोट रोडवरील गांधीनगर ब्रिजच्या खाली गुडघाभर पाणी साचले होते. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना पाण्यातूनच वाट शोधावी लागली. दरवर्षी पावसामुळे या ठिकाणी पाणी साचत असले तरी त्या ठिकाणच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना हाती घेण्यात येत नसल्याने रहिवासी तसेच वाहन चालकांचे हाल होत आहेत. सोमवारी झालेल्या पावसामुळे पाणी तुंबून होते. त्यातूनच भरधाव वेगाने वाहने ये-जा करत असल्याने पावसाचे पाणी इतराच्या अंगावर उडत होते.
शहरासह ग्रामीण भागात वीज पुरवठा खंडित
सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या वळिवाच्या पावसामुळे सोमवारी शहर तसेच तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी झाडे कोसळली. यामुळे वीजवाहिन्या तसेच वीजखांबांचे मोठे नुकसान झाले. वीजवाहिन्या तुटल्याने बऱ्याच ठिकाणी रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा ठप्प होता. सोमवारी दुपारनंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस दाखल झाला. यामध्ये कॅम्प, सदाशिवनगर, गणेशपूर रोड, मराठा कॉलनी यासह इतर भागात झाडे कोसळली. झाडे विद्युत वाहिन्या तसेच खांबांवर कोसळल्याने वीज पुरवठा ठप्प झाला. तासभराहून अधिक वेळ पाऊस झाल्याने दुरुस्तीचे काम करणे शक्य नव्हते. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. परंतु बेळगाव दक्षिण विभागात सर्वाधिक झाडे कोसळल्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यात अडचणी येत होत्या. रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू होते. शहराच्या मध्यवर्ती भागासह गणेशपूर रोड, हिंडलगा आदी परिसरामध्ये वीजपुरवठा ठप्प होता. हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांनी पर्यायी मार्गाने वीजपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरा वीज पुरवठा सुरळीत झाला.