अवकाळी पावसाचा न्हावेलीतील भातशेतीला फटका
वाळत टाकलेले भात शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत गेले पाण्यात
न्हावेली / वार्ताहर
न्हावेली पंचक्रोशीत सोमवारी दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस सुरू झाला. वाळत टाकलेले भात पाण्यात तरंगू लागले. सलग दोन तास पाऊस कोसळल्याने शेतकऱ्याचे न भरून येणारे नुकसान झाले. दिवाळी सण तोंडावर असताना तीन महिने केलेली मेहनत अवकाळी पावसामुळे वाया गेल्याचे पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात मात्र पाणी आले.
दिवाळी सणाला अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. भात कापणीचा हंगाम सुरू असून शेतकऱ्यांनी पाणथळ भागातील भात कापून सुक्या जागी वाळत टाकलेले. सोमवारी दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास जेवण केल्यानंतर मळभ दाटून आले. पावसाची चाहूल लागताच पावसापासून भात वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली. मात्र काही वेळातच विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस सुरू झाला. बघता बघता पिकात पाणी घेणे व कापलेले भात पीक पाण्यात तरंगू लागले. सलग दोन तास बरसल्यामुळे न्हावेली पंचक्रोशीतील शेकडो एकरवर कापलेली भात शेती परतीच्या पावसात भिजून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.