अवकाळी पावसाचा डिचोली तालुक्याला तडाखा
डिचोली व सांखळीतील नद्यांना पूर : सांखळीत पंपिंग प्रक्रिया हाती : चक्क नोव्हेंबर महिन्यात अनुभवला पूर
प्रतिनिधी/ डिचोली
गेले अनेक दिवस सततपणे कोसळणाऱ्या पावसामुळे डिचोली तालुक्याला चक्क नोव्हेंबर महिन्यात पुराचा तडाखा मिळाला. शुक्रवारी (31 ऑक्टोबर) रात्रभर डोंगरमाथ्यावर व खालच्या भागातही जोरदार पाऊस पडल्याने डिचोली व सांखळीतील वाळवंटी नदीला पूरस्थिती निर्माण झाली. सांखळीत पंपिंग प्रक्रिया हाती घेऊन बाजारातील पाणी नदीत फेकण्यात आले. पहाटे डिचोली तालुक्यातील सर्व नद्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती.
डिचोलीतील नदीला बरेच पाणी वाढले होते. नदी काठोकाठ भरून वाहत होती. तर नदीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यानंतर पावसाने उसंत घेतल्याने नदीची पातळी काही प्रमाणात ओसरली होती. पावसाचा मौसम संपूनही गेला तरी पूर्ण ऑक्टोबर महिना सततपणे कोसळलेल्या पावसाने सध्या हद्दच केली आहे. शुक्रवार दि. 31 ऑक्टोबर रोजी संध्याकाळनंतर रात्रभर पडलेल्या पावसामुळे सांखळीतील वाळवंटी नदीला पूर आला. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी इतिहासात प्रथमच सांखळी बाजारात पंप स्टेशनवरून पंपिंग सुरू करून बाजारात साचणारे पाणी नदीत फेकण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली. अशा प्रकारे प्रथमच नोव्हेंबर महिन्यात पूरस्थिती पाहण्याची पाळी सांखळीवासियांवर आली आहे.
डोंगरमाथ्यावर तसेच खालच्या भागातही पावसाचा जोर कायमच असल्याने सांखळीतील वाळवंटी नदीलाही काल शुक्रवारी संध्याकाळी पाणी बरेच वाढले होते. त्यातच शुक्रवारी रात्रभर डोंगरमाथ्यावर व खालीही पावसाची जोरदार वृष्टी चालूच राहिल्याने पहाटे वाळवंटी नदीला पूर आला.
बंदिरवाडा विठ्ठलापूर-सांखळी येथील श्री तोणयेश्वर देवाच्या पेडाच्या वरच्या भागात पाणी पोचले होते. नदीतील पाण्याची पातळी साडेतीन मीटर झाली होती. तर सांखळी बाजारातील नाल्यात तीन मीटरपर्यंत पाणी पोहोचले होते. त्यामुळे पहाटे बाजारातील पाणी बाहेर काढण्यासाठी पंप सुरू करण्यात आले. तसेच बाजारातील नाल्याला असलेली गेट बंद करून बाहेरील पाणी आत येऊ नये, याची दक्षता घेण्यात आली.
यापूर्वी जोरदार पावसामुळे ऑक्टोबरच्या 2 तारखेलासुद्धा सांखळी भागात पूर आल्याचे अनेकजण सांगतात. परंतु संपूर्ण ऑक्टोबर महिना पाऊस पडल्याने नोव्हेंबर महिन्याच्या सुऊवातीलाच पूरस्थिती प्रथमच पाहत असल्याचे नगरसेवक आनंद काणेकर यांनी सांगितले.
दिवाळी व तुळशीच्या लग्न सोहळ्याच्या काळात असा पाऊस व नदीला पूर यापूर्वी कधीच पाहिला नव्हता. परंतु निसर्गाच्या खेळीपुढे कोणाचेही काही चालत नाही हेच खरे, असे म्हणण्याची पाळी आज प्रत्येकावर आली आहे. त्याचीच अनुभूती सांखळीत काल आलेल्या पुराने दाखवून दिली आहे, असेही नगरसेवक आनंद काणेकर यांनी सांगितले.