मध्यवर्ती बसस्थानकात अस्वच्छता
मोकाट जनावरे-कुत्र्यांचा वावर त्रासदायक
बेळगाव : स्मार्ट सिटी योजनेंतर्गत कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करून मध्यवर्ती बसस्थानक निर्माण करण्यात आले आहे. मात्र बसस्थानकात अस्वच्छता व मोकाट जनावरांचा वावर प्रकर्षाने दिसून येत आहे. संपूर्ण बसस्थानक परिसरात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. बसस्थानकात येणारे प्रवासी गुटखा खाऊन बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना थुंकत आहेत. यामुळे बसस्थानकातील भिंतींवर लाल पट्टे दिसत आहेत.
बसस्थानकात अस्वच्छता पसरल्यामुळे प्रवाशांना आरोग्याच्या समस्याही उद्भवण्याचा धोका निर्माण होत आहे. मध्यवर्ती बसस्थानकात मोकाट जनावरे व भटक्मया कुत्र्यांचा वावरही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तसेच भटकी कुत्री बसस्थानकात भरकटत असून प्रवाशांचा चावा घेण्याचाही धोका निर्माण झाला आहे. यामुळे प्रशासनाने भटक्मया जनावरांसह कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
बसस्थानक प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. भटकी जनावरे सर्रासपणे बसस्थानकातच ठाण मांडत आहेत. यामुळे बसस्थानकात अस्वच्छता पसरत आहे. भटकी कुत्री आणि जनावरांच्या वावरावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच गुटखा खाऊन ठिकठिकाणी थुंकण्यात येत असल्याने लाल पट्टे दिसून येत आहेत. यावरही आळा घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे.