For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेफिकीर वाहनचालकांमुळे रेल्वेगेटवर विनाकारण कोंडी

12:07 PM Jan 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेफिकीर वाहनचालकांमुळे रेल्वेगेटवर विनाकारण कोंडी
Advertisement

अनगोळ चौथ्या रेल्वेगेटवरील प्रकार : रहदारी पोलिसांची नेमणूक करण्याची मागणी

Advertisement

प्रतिनिधी / बेळगाव

रस्ते मोठे झाले, परंतु नागरिकांना शहाणपणा मात्र केव्हा येणार? हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. रेल्वेगेटच्या एका बाजूने वाहने हाकावीत, असा नियम असताना बेळगावमध्ये मात्र रेल्वेगेटच्या दुतर्फा वाहनचालक गर्दी करताना दिसतात. यामुळे समोरून येणारे वाहन वाहतूक कोंडीत अडकून पडून विनाकारण कोंडी केली जाते. त्यामुळे या प्रकारांना आता आळा कोण घालणार? असा प्रश्न सुज्ञान वाहन चालकांमधून उपस्थित केला जात आहे.

Advertisement

बेळगाव शहरात टिळकवाडी येथे 3, अनगोळ येथे 1, तानाजी गल्ली येथे 1, अमननगर येथे 1 रेल्वेगेट आहे. ज्यावेळी रेल्वे जात असते, त्यावेळी काही काळ रेल्वेगेट बंद करण्यात येते. या काळात रस्त्याच्या एका बाजूला वाहने थांबविणे गरजेचे असते. परंतु, लवकर सटकण्यासाठी रेल्वेगेटच्या दुतर्फा वाहने घुसडली जातात. यामुळे विनाकारण वाहतूक कोंडी होत असून अपघाताला आमंत्रण दिले जाते. तसेच समोरून येणाऱ्या वाहनचालकांसोबत वादावादी होते. त्यामुळे वाहतुकीचे नियम कोण पाळणार? हा प्रश्न निर्माण होतो.

अनगोळ येथील चौथे रेल्वेगेट येथे पूर्वी एकच मार्ग असल्याने प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी जनतेच्या सोयीसाठी हा मार्ग दुहेरी करण्यात आला. मार्ग दुहेरी झाला तरी नागरिकांची खोड मात्र गेलेली नाही. रेल्वेगेट समोरील संपूर्ण रस्ता अडवून उभे राहण्यात ते धन्यता मानत आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी रहदारी पोलिसांची नेमणूक करण्याची मागणी वाहनचालकांमधून केली जात आहे.

Advertisement

.