उन्नती हुडा, सात्विक-चिराग उपांत्यपूर्व फेरीत
चायना ओपन सुपर 1000 बॅडमिंटन : उन्नती हुडाचा पीव्ही सिंधूलाही धक्का, एचएस प्रणॉय पराभूत
वृत्तसंस्था/चँगझाऊ, चीन
कारकिर्दीतील एक सर्वोत्तम विजय नोंदवताना भारताच्या उन्नती हुडाने आपल्याच देशाच्या पीव्ही सिंधूला चायना ओपन सुपर 1000 बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत पराभवाचा धक्का दिला आणि उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. याशिवाय सात्विक-चिराग यांनीही आगेकूच केली तर एचएस प्रणॉयचे आव्हान संपुष्टात आले. 17 वर्षीय उन्नती सिंधूविरुद्ध दुसऱ्यांदा खेळत होती. मोक्याच्या क्षणी तिने अतिशय संयमी खेळ करीत तिने सिंधूचा 21-16, 19-21, 21-13 असा 73 मिनिटांच्या खेळात पराभव करून सनसनाटी निर्माण केली. सुपर 1000 स्पर्धेत उपांत्य फेरी गाठण्याची तिची ही पहिलीच वेळ आहे. उन्नतीने ओडिशा मास्टर्स या सुपर 100 स्पर्धेचे 2022 मध्ये तर 2023 माध्ये अबु धाबी मास्टर्स स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. तिची पुढील लढत जपानच्या अकाने यामागुचीशी होईल. तिसरे मानांकन असलेली यामागुची दोन वेळची वर्ल्ड चॅम्पियन आहे.