बेळगावविना ‘संयुक्त महाराष्ट्र’ अपूर्णच
सीमावासियांकडून खंत : हुतात्मा चौक येथे हुतात्म्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण : अभिवादनासाठी मराठी भाषिक एकवटले
बेळगाव : सीमाप्रश्न सुटावा आणि मराठी भाषिकांना महाराष्ट्रात आपल्या भाषेच्या राज्यात जाता यावे, यासाठी अनेकांनी आपल्या जीवाची बाजी लावली. यामध्ये हौतात्म्य पत्करलेल्या सीमावासियांना शुक्रवारी हुतात्मा दिनाचे औचित्य साधून अभिवादन करण्यात आले. बेळगावच्या हुतात्मा चौक येथे झालेल्या या श्रद्धांजली कार्यक्रमावेळी शेकडोंच्या संख्येने मराठी भाषिक एकवटले होते. महाराष्ट्र सरकारची कार्यपद्धती व सीमावासियांची होत असलेली कोंडी याबद्दल अनेकांनी खंत व्यक्त केली. हुतात्म्यांना अभिवादन करताना अॅड. राजाभाऊ पाटील म्हणाले, एकाच भाषेचे राज्य व्हावे यासाठी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा लढा पुकारण्यात आला. मोठा संघर्ष करून महाराष्ट्राला मुंबई मिळाली. परंतु बेळगावसह संपूर्ण सीमाभाग इतर प्रांताला जोडण्यात आला. आज 69 वर्षे झाली. परंतु बेळगावविना संयुक्त महाराष्ट्र अपूर्णच असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
प्रारंभी हुतात्मा चौक येथे हुतात्म्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अॅड. राजाभाऊ पाटील, बी. ओ. येतोजी यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मध्यवर्ती म. ए. समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर म्हणाले, सीमालढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे सीमावासियांना आजही स्मरण आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शिवसेनेने 67 हुतात्मे दिले. त्याचबरोबर कन्नडसक्ती आंदोलनात बेळगावमध्ये अनेकांना हौतात्म्य आले. या सर्व हुतात्म्यांना आजही शेकडोंच्या संख्येने सीमाबांधव अभिवादन करण्यासाठी येतात. सीमाप्रश्नाची सोडवणूक ही त्यांच्यासाठीची खरी श्रद्धांजली आहे, असे त्यांनी सांगितले. हुतात्म्यांच्या प्रतिमेला पुष्पहार व पुष्पचक्र प्रदान केल्यानंतर पारंपरिक मार्गाने फेरी काढण्यात आली. रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, खडेबाजार, मारुती गल्ली, अनसूरकर गल्ली, किर्लोस्कर रोड मार्गे हुतात्मा चौकापर्यंत मूकफेरी काढण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येने मराठी भाषिक सहभागी झाले होते. यामध्ये पुरुषांसह महिलांचीही संख्या मोठी होती.
अनसूरकर गल्ली येथे मधू बांदेकर यांच्या प्रतिमेचे पूजन नगरसेवक शिवाजी मंडोळकर व रवी साळुंखे यांच्या हस्ते झाले. बाबुराव ठाकुर यांच्या प्रतिमेचे पूजन रमाकांत कोंडुसकर यांच्या हस्ते झाले. महादेव बारागडी यांच्या प्रतिमेचे पूजन प्रकाश मरगाळे व अॅड. महेश बिर्जे यांनी केले. लक्ष्मण गावडा यांच्या प्रतिमेला माजी महापौर सरिता पाटील, महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर यांनी पुष्पहार अर्पण केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मदन बामणे यांनी केले. यावेळी नेताजी जाधव, रणजित चव्हाण-पाटील, अंकुश केसरकर, प्रकाश शिरोळकर, शुभम शेळके, सतीश पाटील, प्रमोद पाटील, शिवानी पाटील, श्रीकांत कदम, आप्पासाहेब गुरव, प्रकाश अष्टेकर, बंडू केरवाडकर, शिवाजी हावळाण्णाचे, सुनील बोकडे, शिवाजी कुडुचकर, शिवाजी हंगिरगेकर, चंद्रकांत कोंडुसकर, श्रीकांत मांडेकर यांच्यासह सीमावासियांनी हुतात्म्यांना अभिवादन केले.