जोशी आय इन्स्टिट्यूट-डॉ.कोडकणीज आय सेंटरतर्फे युनायटेड फॉर व्हिजन
बेळगाव : नेत्ररोग शास्त्रातील उत्तर कर्नाटकातील सर्वात प्रतिष्ठित नावे असलेल्या हुबळी येथील डॉ. एम. एम. जोशी आय इन्स्टिट्यूट व डॉ. कोडकणीज आय सेंटर यांनी युनायटेड फॉर व्हिजन या नवीन सहकार्याच्या विलिनीकरणाची घोषणा केली आहे. काकती येथील वुडरोज बँक्वेट्स अॅण्ड हॉटेलमध्ये झालेल्या कार्यक्रमात या सहकार्याची माहिती देण्यात आली. डॉ. शिल्पा कोडकणी यांनी हुबळी येथील एम. एम. जोशी आय इन्स्टिट्यूटचे संचालक पद्मश्री डॉ. एम. एम. जोशी, डॉ. ए. एस. गुरुप्रसाद, डॉ. सत्यमूर्ती, डॉ. आर. कृष्णप्रसाद, डॉ. श्रीनिवास जोशी यांचा परिचय तसेच उपस्थितांचे स्वागत केले. डॉ. शिल्पा कोडकणी म्हणाल्या, या ऐतिहासिक विलिनीकरणामुळे सन् 2000 मध्ये स्थापन झालेल्या केईसीमुळे दीर्घकालीन दृष्टी साध्य होईल. डॉ. एम. एम. जोशी आय इन्स्टिट्यूटमधील डॉक्टर पुढील 25 वर्षे तंत्रज्ञान, व्यापक नेत्र काळजी आणि नीतिमत्तेचा एक उत्तम संगम बनणार आहे.
यावेळी दोन्ही संस्थांच्या कार्याचा आढावा घेणारा व्हिडिओ दाखविण्यात आला. त्यानंतर नवीन लोगोचे अनावरण करण्यात आले. डॉ. ए. एस. गुरुप्रसाद, डॉ. सत्यमूर्ती, डॉ. आर. कृष्णप्रसाद, डॉ. श्रीनिवास जोशी यांनी नवीन तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली. सर्व वयोगटातील लोकांसाठी मोतिबिंदू, चष्मामुक्त दृष्टीसाठी स्माईल तंत्रज्ञानामध्ये झीमर-8 रोबोटिक शस्त्रक्रियांसाठी एकत्रिकरण, अॅडव्हान्स रेटिनल लेसर सर्जरी, मुलांमध्ये कार्निअल ट्रान्सप्लांट, स्क्विंट आणि संबंधित समस्यांसाठी अत्याधुनिक सेवा दिली जाणार आहे. कार्यक्रमाला केएलईचे डॉ. प्रभाकर कोरे, आमदार असिफ सेठ, उद्योजक माधव गोगटे, उद्योजक अनिष मेत्राणी यांसह मान्यवर उपस्थित होते. डॉ. प्रभाकर कोरे यांनी या सहयोगाबद्दल शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला बेळगाव ऑप्थमिक असोसिएशनचे नेत्रतज्ञ, इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर व इतर संघटनांचे सदस्य उपस्थित होते. डॉ. ए. एस. गुरुप्रसाद यांनी आभार मानले.