संयुक्त अरब अमिरात 11 धावांनी विजयी
मोहम्मद वासिम, लाक्रा यांची अर्धशतके : सामनावीर नासिरचे 4 बळी
वृत्तसंस्था/ शारजाह
तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील येथे रविवारी खेळविण्यात आलेल्या दिवस-रात्रीच्या दुसऱ्या सामन्यात संयुक्त अरब अमिरातने (युएई) अफगाणचा 11 धावांनी पराभव करत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. संयुक्त अरब अमिरातच्या अली नसीरला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. त्याने 24 धावात 4 गडी बाद केले.
या सामन्यात संयुक्त अरब अमिरातने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. अमिरातने 20 षटकात 7 बाद 166 धावा जमविल्या. त्यानंतर अफगाणचा डाव 19.5 षटकात 155 धावात आटोपला.
अमिरातच्या डावामध्ये कर्णधार मोहम्मद वासिम आणि आर्यन लाक्रा यांनी शानदार अर्धशतके झळकवली. या जोडीने सलामीच्या गड्यासाठी 51 चेंडूत 72 धावांची भागिदारी केली. वासिमने 32 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांसह 53 तर लाक्राने 47 चेंडूत 4 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 63 धावा जमविल्या. तनिश सुरीने 1 षटकार आणि 1 चौकारासह 11 तसेच अकिफ राजाने 2 चौकारांसह नाबाद 13 धावा जमविल्या. अमिरातच्या डावात 8 षटकार आणि 11 चौकार नोंदविले गेले. अफगाणतर्फे ओमरझाई आणि कैस अहमद यांनी प्रत्येकी 2 तर फझलहक फारुकी आणि मोहम्मद नबी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. संयुक्त अरब अमिरातने पॉवर प्ले दरम्यानच्या पहिल्या 6 षटकात एकडी गडी न गमाविताना 55 धावा केल्या. अमिरातचे अर्धशतक 34 चेंडूत तर शतक 83 चेंडूत आणि दीडशतक 113 चेंडूत फलकावर लागले. मोहम्मद वासिम आणि लाक्रा यांनी सलामीच्या गड्यासाठी अर्धशतकी भागिदारी 34 चेंडूत पूर्ण केली.
प्रत्युत्तरादाखल खेळताना अफगाणच्या डावामध्ये सलामीच्या झेझाईने 27 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांसह 36 धावा जमविताना गुरबाज समवेत सलामीच्या गड्यासाठी 47 धावांची भागिदारी केली. गुरबाजने 17 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 21 धावा केल्या. कर्णधार इब्राहिम झेद्रानने 4 धावा जमविल्या. नजिबूल झद्रनने 2 चौकारांसह 12 तसेच मोहम्मद नबीने 27 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह 47, कैस अहमदने 13 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 18, नूर अहमदने 4 चेंडूत 1 षटकारासह 8 धावा जमविल्या. अफगाणने पॉवर प्ले दरम्यानच्या पहिल्या 6 षटकात 47 धावा जमविताना 1 गडी गमाविला. अफगाणचे अर्धशतक 39 चेंडूत, शतक 87 चेंडूत तर दीडशतक 116 चेंडूत नोंदविले गेले. संयुक्त अरब अमिराततर्फे मोहम्मद जवादुल्लाह आणि अली नसीर यांनी प्रत्येकी 4 गडी बाद केले. सिद्दिकी आणि अकिफ राजा यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला. या मालिकेतील पहिला सामना अफगाणने जिंकून आघाडी मिळविली होती. पण अरब अमिरातने रविवारचा दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधली आहे.
संक्षिप्त धावफलक : संयुक्त अरब अमिरात 20 षटकात 7 बाद 166 (मोहम्मद वासिम 53, आर्यन लाक्रा नाबाद 63, सुरी 11, अकिफ राजा नाबाद 13, अवांतर 12, ओमरझाई 2-35, कैस अहमद 2-15, फारुकी, नबी प्रत्येकी 1 बळी), अफगाण 19.5 षटकात सर्व बाद 155 (झेझाई 36, गुरबाज 21, इब्राहिम झद्रन 4, नजिबुल झद्रन 12, मोहम्मद नबी 47, कैस अहमद 18, नुर अहमद 8, अवांतर 8, मोहम्मद जवादुल्लाह 4-26, अली नसीर 4-24, सिद्दिकी 1-36, अकिफ राजा 1-33).