स्वत:च्या सुरक्षेसाठी व्हा एकजूट : सरसंघचालक
भाषा, जात अन् प्रादेशिकतेत विभागले जाऊ नका : हिंदूंना भागवत यांचे आवाहन
वृत्तसंस्था/ बारां
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागव यांनी बारां येथे आयोजित स्वयंसेवक एकत्रीकरण कार्यक्रमात 3500 हून अधिक स्वयंसेवकांना संबोधित केले. यादरम्यान त्यांनी भारताची जागतिक प्रतिष्ठा ही केवळ एक मजबूत राष्ट्रामुळेच असल्याचे नमूद केले. कुठल्याही देशाच्या स्थलांतरितांच्या सुरक्षेची हमी तेव्हाच असते, जेव्हा त्याची मातृभूमी शक्तिशाली असेल, अन्यथा एका कमकुवत राष्ट्राच्या स्थलांतरितांना प्रस्थान करण्याचा आदेश दिला जात असल्याचे भागवत यांनी म्हटले आहे. सुरक्षित रहायचे असल्यास हिंदू समाजाला भाषा, जात अन् प्रांतीय मतभेद संपुष्टात आणत एकजूट व्हावे लागेल असा खास संदेश यावेळी सरसंघचालकांनी दिला आहे.
भारत एक हिंदू राष्ट्र आहे. आम्ही येथे अनादि काळापासून राहत आहोत. हिंदू उपनाम नंतर उदयास आले असले तरीही हिंदु शब्दाचा वापर भारतात राहणाऱ्या सर्व संप्रदायांसाठी केला जात राहिला आहे. हिंदू सर्वांना आपले मानतो आणि सर्वांची गळाभेट घेतो. आम्ही आणि तुम्ही दोघेही आपाआपल्या ठिकाणी बरोबर आहोत असे हिंदू म्हणतो. हिंदू निरंतर संवादाच्या माध्यमातून सामंजस्यपूर्ण सह-अस्तित्वावर विश्वास करतो असे उद्गार भागवत यांनी काढले आहेत.
हिंदू समाजाने भाषा, जातीय आणि क्षेत्रीय असमानता आणि संघर्ष संपुष्टात आणत स्वत:च्या सुरक्षेसाठी एकजूट होण्याची गरज आहे. संघटन, सद्भावना आणि परस्पर श्रद्धा व्याप्त असलेल्या समाजाची निर्मिती व्हायला हवी. लोकांच्या वर्तनात शिस्त, राज्याबद्दल दायित्व आणि उद्देशांबद्दल समर्पण असायला हवे. समाजाची निर्मिती केवळ व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबांद्वारे होत नाही. समाजाच्या व्यापक चिंतांवर विचार करूनच कुठलाही व्यक्ती अध्यात्मिक संतुष्टी प्राप्त करू शकतो असे भागवत यांनी म्हटले आहे.
संघाचे कार्य यांत्रिक नसून विचारांवर आधारित आहे. समाजाच्या निर्मितीसाठी संघाइतके प्रयत्न करणारे जगात अन्य कुठलीच संघटना नाही. समुद्ध जसा अद्वितीय आहे, तसेच आकाश जसा अद्वितीय आहे, त्याचप्रकारे संघ देखील अतुलनीय आहे. संघाची मूल्य प्रथम संघटनेच्या नेत्यांपर्यंत पोहोचतात, त्यांच्याकडून स्वयंसेवक आणि स्वयंसेवकांकडून परिवारापर्यंत पोहोचतात आणि अखेरीस समाजाला आकार देतात. संघात व्यक्तिमत्त्व निर्माण करण्याची हीच प्रक्रिया असल्यचे भागवत यांनी म्हटले आहे.
भागवत यांनी स्वयंसेवकांना समुदायांमध्ये व्यापक संपर्क कायम राखण्याचे आवाहन केले आहे. समाजाला सशक्त करून सामुदायिक त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला जावा. सामाजिक समरसता, न्याय, आरोग्य, शिक्षण आणि स्वावलंबनावर जोर असायला हवा. स्वयंसेवकांनी स्वत:च्या कार्यात तत्पर रहावे. संघाचे स्वयंसेवक परिवारांमध्ये सद्भाव, पर्यावरण चेतना, कौटुंबिक शिक्षण, स्वदेशी मूल्य आणि नागरी जागरुकतेला प्रोत्साहन देऊ शकतात. छोट्या छोट्या प्रथांना दैनंदिन जीवनात सामील करून समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान दिले जाऊ शकते असे सरसंघचालकांनी म्हटले आहे.