For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गरजवंतांची सेवा हेच मोठे समाधान!

06:48 AM Nov 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
गरजवंतांची सेवा हेच मोठे समाधान
Advertisement

अंतिम कार्यदिनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे निरोप सभारंभात भावपूर्ण उद्गार : उद्या सेवानिवृत्ती

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारताच्या सरन्यायाधीश पदावरुन गरजवंतांची सेवा करण्याची संधी मिळाली, याचे मोठे समाधान वाटते, असे भावपूर्ण उद्गार सरन्यायाधीश धनंजय  यशवंत चंद्रचूड यांनी आपल्या निरोप समारंभात काढले आहेत. ते तांत्रिकदृष्ट्या 10 नोव्हेंबरला, अर्थात येत्या रविवारी निवृत्त होणार आहेत. तथापि, शुक्रवार हा त्यांचा अंतिम कार्यदिन होता. त्यामुळे त्यांचा निरोप समारंभही शुक्रवारीच झाला. आता धनंजय चंद्रचूड यांच्या सेवानिवृत्तीनंतर सोमवारपासून न्यायमूर्ती संजीव खन्ना हे देशाचे 51 वे सरन्यायाधीश असतील. सोमवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील.

Advertisement

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना निरोप देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या चार ज्येष्ठ न्यायाधीशांचे एक विशेष पीठ स्थापन करण्यात आले होते. या पीठात त्यांच्यासह भावी सरन्यायाधीश संजीव खन्ना, न्या. जे. बी. परदीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांचा समावेश होता. या कार्यक्रमात मावळत्या सरन्यायाधीशांनी न्यायसंस्थेतील त्यांच्या उपलब्धींसंबंधी समाधान व्यक्त करतानाच आपल्याला प्रदीर्घ काळ लोकांच्या सेवेची संधी आणि अधिकार प्राप्त झाला आणि देशाची सेवा करता आली, यासंबंधी त्यांनी धन्यता प्रगट केली. त्यांच्या सहकारी न्यायाधीशांनीही या कार्यक्रमात त्यांच्या कार्याचे आणि सततच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

इतका उत्साह कसा...

आपण नेहमी इतके उत्साही आणि कार्यरत कसे असता, असा प्रश्न आपल्याला  विचारला जातो. माझ्या उत्साहाचे आणि कार्यरततेचे रहस्य या न्यायालयातच आहे. या न्यायालयाने मला नेहमी कामात ठेवले. न्यायिक सेवेत असताना एक दिवसही असा गेला नाही, की ज्या दिवशी काही नवे शिकायला मिळाले नाही. तसेच देशाची सेवा करायला मिळाली नाही, असा एक क्षणही गेला नाही. माझ्या न्यायदानामुळे असंख्य अज्ञात लोकांचाही लाभ झाला असेल, ज्यांना मी भेटूही शकलो नाही, अशा शब्दांमध्ये त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

मान्यवर विधितज्ञांची उपस्थिती

मावळते सरन्यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूड यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला भावी सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्यासह अनेक विधी आणि न्यायक्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. महाधिवक्ता तुषार मेहता, सॉलिसिटर जनरल सुब्रमण्यम, सर्वोच्च न्यायालय वकील संघटनेचे अध्यक्ष कपिल सिब्बल आणि इतर मान्यवर न्यायाधीश आणि विधीतज्ञ यांनी या कार्यक्रमात भाग घेतला.

कायद्याचा विद्यार्थी ते सरन्यायाधीश

आपल्या निरोपाच्या भाषणात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी त्यांच्या कायद्याच्या विद्यार्थीदशेपासून भारताचे सरन्यायाधीश होण्यापर्यंतच्या कालखंडाचा आढावा घेतला. या कालखंडात कायदा ते न्यायसंस्था अशी प्रगती करताना आपल्याला कोणकोणत्या टप्प्यांमधून जावे लागले आणि कोणत्या आव्हानांचा स्वीकार करावा लागला, याचाही परामर्ष त्यांनी उपस्थितांसमोर मांडला. आपल्याला उत्कट सहकार्य करणाऱ्या आपल्या सहकाऱ्यांचीही त्यांनी प्रशंसा केली. न्यायदानाची प्रक्रिया ही केवळ एका व्यक्तीसंबंधातील नसून ते एका संस्थेचे कार्य आहे. कायद्याचा विद्यार्थी या नात्याने सर्वोच्च न्यायालयाच्या शेवटच्या बाकावर बसून कामकाज पाहणे ते सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश होणे हा प्रवास अद्भूत आणि अविस्मरणीय होता, असेही भाष्य त्यांनी यावेळी केले. भाषणाच्या शेवटी त्यांनी आपल्या सर्व ज्ञात-अज्ञात सहकाऱ्यांचे मन:पूर्वक आभार मानले.

सेवाकाळातील पथदर्शक निर्णय

भारताचे सरन्यायाधीश या नात्याने त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय दिले आहेत. या निर्णयांमध्ये भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद 370 निष्प्रभ ठरविणे, विशेष विवाह कायदा समलिंगी संबंधांना लागू न करणे, निवडणूक रोखे व्यवस्था घटनाबाह्या ठरविणे असे अनेक आहेत. हे पथदर्शक निर्णय म्हणून मान्यता पावले आहेत.

Advertisement
Tags :

.