कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

एकेमवाद्वितीय !

06:00 AM Jun 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पोर्तुगालनं नुकताच ‘नेशन्स लीग’चा किताब आपल्या खात्यात जमा केला...यात मोलाची भूमिका बजावली ती ‘सीआर सेव्हन’ म्हणजे क्रिस्तियानो रोनाल्डानंही...अर्थात जबरदस्त खेळ अन् रोनाल्डो यांचं मागील कित्येक वर्षांपासून अतूट नातं राहिलेलं असून फुटबॉलच्या इतिहासातील अद्वितीय खेळाडूंपैकी तो एक...सर्वांत महत्त्वाचं म्हणजे चाळिशी पार केलेली असून देखील त्याच्याकडून अप्रतिम कामगिरी घडणं कायम राहिलंय...

Advertisement

या पृथ्वीवर ‘त्याच्या’ कौशल्याला, घणाघाती ‘फ्री-कीक’ला, अचूक ‘हेडर’ला, हमखास लक्ष्यभेद करणाऱ्या पेनल्टीवरील फटक्यांना अन् अफलातून ‘पासेस’ना टक्कर देणारा दुसरा फुटबॉलपटू नाहीये...अपवाद फक्त अर्जेंटिनाच्या लायोनेल मेस्सीचा...बार्सिलोनाच्या व स्पेनच्या महानतेच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या यमालनं ‘इन्स्टाग्राम’वर लिहिलंय की, त्याचा जन्मच झालाय तो या क्षणासाठी...विशेष म्हणजे पोर्तुगालच्या त्या खेळाडूनं कारकिर्दीला प्रारंभ केला, चषक जिंकण्यास सुरुवात केली त्यावेळी यमालचा जन्म देखील झाला नव्हता...प्रत्येकाला माहीत आहे की, यमाल हा भविष्यातील सुपरस्टार. खुद्द ‘त्यानं’ देखील ते मान्य केलंय. परंतु सदर 17 वर्षीय खेळाडूला अजून बरीच वाटचाल करायचीय...‘सीआर सेव्हन’नं नेहमीच दर्शन घडविलंय ते जबरदस्त प्रतिकार, गोल नोंदविण्याची भूक अन् स्वप्नांच्या पाठलागाचं. विशेष म्हणजे पोर्तुगालच्या तिजोरीत ‘नेशन्स लीग’चं जेतेपद जमा करताना सुद्धा पाहायला मिळालीय ती हीच वृत्ती...

Advertisement

‘त्यानं’ पोर्तुगालला 2023 ते 2025 कालावधीतील ‘यूएफा नॅशनल लीग’ जिंकून दिलीय ती युरोपियन करंडक स्पर्धा जिंकणाऱ्या स्पेनला म्युनिक येथील अलायन्झ एरिनावर पेनल्टी शूटआऊटच्या साहाय्यानं गारद करण्याची वाट मोकळी करून...40 व्या वर्षी देखील ‘तो’ स्पर्धेत सर्वांत जास्त आठ गोल नोंदविणारा खेळाडू ठरलाय. ‘त्याच्या’च फटक्यामुळं देशाला 2-2 अशी बरोबरी साधणं शक्य झालं. त्यापूर्वी जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी असलेला ‘बालॉन डी ऑर’ चषक तब्बल पाच वेळा आपल्या  नावावर जमा करणाऱ्या त्या महान खेळाडूनं जर्मनीवर पाळी आणली होती ती गाशा गुंडाळण्याची...पोर्तुगालच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ खेळाडू...क्रिस्तियानो रोनाल्डो...

रोनाल्डो संपलाय अशी नेहमी आरडाओरड करणाऱ्या विश्लेषकांना पुन्हा एकदा अक्षरश: जबरदस्त उत्तर मिळालंय. विश्वचषक स्पर्धेत आणि ‘युरो’मध्ये त्याला फॉर्मशी झुंजावं लागलं. तरीही त्याचं लक्ष फुटबॉलपासून कधीही विचलित झालं नाही. या स्पर्धेत ‘पीएसजी’चा बचावपटू नुनो मेंडिसनं जबरदस्त कामगिरीचं दर्शन घडविलेलं असलं, तरी क्रिस्तियानोनं दिलेलं योगदान नजरेआड करणं अशक्यच. विशेष म्हणजे तो 40 व्या वर्षी देखील असा खेळतोय तरी कसा ?...जगभरातील फुटबॉलवर मनापासून प्रेम करणाऱ्यांना पडलेला हा प्रश्न...त्याला स्पर्धेत अनेकदा चेंडूवर योग्य प्रकारे नियंत्रण ठेवणं जमलं नाही, तासभर चेंडूला पाय लावणं देखील अशक्य बनलं, परंतु जेव्हा जेव्हा गोल नोंदविण्याची सुवर्णसंधी चालून आली तेव्हा तेव्हा त्यानं ती अजिबात दवडली नाही...

अंतिम सामन्यात मेंडिसनं यमालचा खात्मा केला आणि चेंडू क्रॉस केला तो ‘सीआर सेव्हन’च्या दिशेनं. त्या क्षणाची वाट पाहत उभ्या असलेल्या क्रिस्तियानो रोनाल्डोनं मग क्षणार्धात वाऱ्याच्या गतीनं पोर्तुगालला बरोबरी साधून दिली. त्या सुपरस्टारनं देशातर्फे नोंदविलेला तो 138 वा गोल...रोनाल्डो नेहमीच संघाला गरज पडलीय तेव्हा जादुई कामगिरीसह मदतीला धावून आलाय. पोर्तुगालच्या प्रत्येक स्थानावर एक अतिशय गुणी खेळाडू खेळतोय अन् पूर्वी देखील खेळलाय. या पार्श्वभूमीवर त्यांनी येऊ घातलेल्या पाच-सहा वर्षांत विश्वचषक वा युरो स्पर्धा जिंकली नाही, तर फार मोठा अपेक्षाभंग होईल (‘सीआर सेव्हन’चं स्वप्न देखील असेल ते तसंच)...प्रशिक्षक रॉबर्टो मार्टिनेझ यांच्यात क्षमता आहे ती लगेच खेळाचं विश्लेषण करण्याची. या त्यांच्या गुणाची देशाला फार मोठी मदत झालीय...

याउलट स्पॅनिश प्रशिक्षकांच्या बाबतीत दर्शन घडलं ते पुन्हा पुन्हा एकच चूक करताना...88 व्या मिनिटाला पायाला दुखापत झाल्यानं मैदान सोडाव्या लागलेल्या क्रिस्तियानो रोनाल्डोला त्याच्या आवडत्या पेनल्टी शूटआऊटमध्ये सहभागी होता आलेलं नसलं, तरी गालावरून ओघळणाऱ्या अश्रूंनी सर्व कहाणी जगभरातल्या फुटबॉलप्रेमींपर्यंत एका क्षणात पोहोचविली...रोनाल्डोनं ‘सौदी प्रोफेशनल लीग’मध्ये (एसपीएल) प्रतिनिधीत्व केलंय ते ‘अल-नासर’ संघाचं. परंतु ‘अल-फताह’नं त्यांचा 2-3 असा पराभव केल्यानं ‘एएफसी चॅम्पियन्स लीग’मध्ये येत्या हंगामात खेळण्याची संधी मात्र चुकलीय. ‘अल-इतिहाद’ व ‘अल-हिलाल’ यांच्या पाठोपाठ त्यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलंय !

रोनाल्डोचे भीमपराक्रम...

क्लब स्तरावर सर्वाधिक गोल करणारे खेळाडू...

आंतरराष्ट्रीय स्तरावर देशातर्फे सर्वाधिक गोल नोंदविणारे खेळाडू

- राजू प्रभू

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article