For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एकेमवाद्वितीय !

06:00 AM Jun 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
एकेमवाद्वितीय
Advertisement

पोर्तुगालनं नुकताच ‘नेशन्स लीग’चा किताब आपल्या खात्यात जमा केला...यात मोलाची भूमिका बजावली ती ‘सीआर सेव्हन’ म्हणजे क्रिस्तियानो रोनाल्डानंही...अर्थात जबरदस्त खेळ अन् रोनाल्डो यांचं मागील कित्येक वर्षांपासून अतूट नातं राहिलेलं असून फुटबॉलच्या इतिहासातील अद्वितीय खेळाडूंपैकी तो एक...सर्वांत महत्त्वाचं म्हणजे चाळिशी पार केलेली असून देखील त्याच्याकडून अप्रतिम कामगिरी घडणं कायम राहिलंय...

Advertisement

या पृथ्वीवर ‘त्याच्या’ कौशल्याला, घणाघाती ‘फ्री-कीक’ला, अचूक ‘हेडर’ला, हमखास लक्ष्यभेद करणाऱ्या पेनल्टीवरील फटक्यांना अन् अफलातून ‘पासेस’ना टक्कर देणारा दुसरा फुटबॉलपटू नाहीये...अपवाद फक्त अर्जेंटिनाच्या लायोनेल मेस्सीचा...बार्सिलोनाच्या व स्पेनच्या महानतेच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या यमालनं ‘इन्स्टाग्राम’वर लिहिलंय की, त्याचा जन्मच झालाय तो या क्षणासाठी...विशेष म्हणजे पोर्तुगालच्या त्या खेळाडूनं कारकिर्दीला प्रारंभ केला, चषक जिंकण्यास सुरुवात केली त्यावेळी यमालचा जन्म देखील झाला नव्हता...प्रत्येकाला माहीत आहे की, यमाल हा भविष्यातील सुपरस्टार. खुद्द ‘त्यानं’ देखील ते मान्य केलंय. परंतु सदर 17 वर्षीय खेळाडूला अजून बरीच वाटचाल करायचीय...‘सीआर सेव्हन’नं नेहमीच दर्शन घडविलंय ते जबरदस्त प्रतिकार, गोल नोंदविण्याची भूक अन् स्वप्नांच्या पाठलागाचं. विशेष म्हणजे पोर्तुगालच्या तिजोरीत ‘नेशन्स लीग’चं जेतेपद जमा करताना सुद्धा पाहायला मिळालीय ती हीच वृत्ती...

‘त्यानं’ पोर्तुगालला 2023 ते 2025 कालावधीतील ‘यूएफा नॅशनल लीग’ जिंकून दिलीय ती युरोपियन करंडक स्पर्धा जिंकणाऱ्या स्पेनला म्युनिक येथील अलायन्झ एरिनावर पेनल्टी शूटआऊटच्या साहाय्यानं गारद करण्याची वाट मोकळी करून...40 व्या वर्षी देखील ‘तो’ स्पर्धेत सर्वांत जास्त आठ गोल नोंदविणारा खेळाडू ठरलाय. ‘त्याच्या’च फटक्यामुळं देशाला 2-2 अशी बरोबरी साधणं शक्य झालं. त्यापूर्वी जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी असलेला ‘बालॉन डी ऑर’ चषक तब्बल पाच वेळा आपल्या  नावावर जमा करणाऱ्या त्या महान खेळाडूनं जर्मनीवर पाळी आणली होती ती गाशा गुंडाळण्याची...पोर्तुगालच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ खेळाडू...क्रिस्तियानो रोनाल्डो...

Advertisement

रोनाल्डो संपलाय अशी नेहमी आरडाओरड करणाऱ्या विश्लेषकांना पुन्हा एकदा अक्षरश: जबरदस्त उत्तर मिळालंय. विश्वचषक स्पर्धेत आणि ‘युरो’मध्ये त्याला फॉर्मशी झुंजावं लागलं. तरीही त्याचं लक्ष फुटबॉलपासून कधीही विचलित झालं नाही. या स्पर्धेत ‘पीएसजी’चा बचावपटू नुनो मेंडिसनं जबरदस्त कामगिरीचं दर्शन घडविलेलं असलं, तरी क्रिस्तियानोनं दिलेलं योगदान नजरेआड करणं अशक्यच. विशेष म्हणजे तो 40 व्या वर्षी देखील असा खेळतोय तरी कसा ?...जगभरातील फुटबॉलवर मनापासून प्रेम करणाऱ्यांना पडलेला हा प्रश्न...त्याला स्पर्धेत अनेकदा चेंडूवर योग्य प्रकारे नियंत्रण ठेवणं जमलं नाही, तासभर चेंडूला पाय लावणं देखील अशक्य बनलं, परंतु जेव्हा जेव्हा गोल नोंदविण्याची सुवर्णसंधी चालून आली तेव्हा तेव्हा त्यानं ती अजिबात दवडली नाही...

अंतिम सामन्यात मेंडिसनं यमालचा खात्मा केला आणि चेंडू क्रॉस केला तो ‘सीआर सेव्हन’च्या दिशेनं. त्या क्षणाची वाट पाहत उभ्या असलेल्या क्रिस्तियानो रोनाल्डोनं मग क्षणार्धात वाऱ्याच्या गतीनं पोर्तुगालला बरोबरी साधून दिली. त्या सुपरस्टारनं देशातर्फे नोंदविलेला तो 138 वा गोल...रोनाल्डो नेहमीच संघाला गरज पडलीय तेव्हा जादुई कामगिरीसह मदतीला धावून आलाय. पोर्तुगालच्या प्रत्येक स्थानावर एक अतिशय गुणी खेळाडू खेळतोय अन् पूर्वी देखील खेळलाय. या पार्श्वभूमीवर त्यांनी येऊ घातलेल्या पाच-सहा वर्षांत विश्वचषक वा युरो स्पर्धा जिंकली नाही, तर फार मोठा अपेक्षाभंग होईल (‘सीआर सेव्हन’चं स्वप्न देखील असेल ते तसंच)...प्रशिक्षक रॉबर्टो मार्टिनेझ यांच्यात क्षमता आहे ती लगेच खेळाचं विश्लेषण करण्याची. या त्यांच्या गुणाची देशाला फार मोठी मदत झालीय...

याउलट स्पॅनिश प्रशिक्षकांच्या बाबतीत दर्शन घडलं ते पुन्हा पुन्हा एकच चूक करताना...88 व्या मिनिटाला पायाला दुखापत झाल्यानं मैदान सोडाव्या लागलेल्या क्रिस्तियानो रोनाल्डोला त्याच्या आवडत्या पेनल्टी शूटआऊटमध्ये सहभागी होता आलेलं नसलं, तरी गालावरून ओघळणाऱ्या अश्रूंनी सर्व कहाणी जगभरातल्या फुटबॉलप्रेमींपर्यंत एका क्षणात पोहोचविली...रोनाल्डोनं ‘सौदी प्रोफेशनल लीग’मध्ये (एसपीएल) प्रतिनिधीत्व केलंय ते ‘अल-नासर’ संघाचं. परंतु ‘अल-फताह’नं त्यांचा 2-3 असा पराभव केल्यानं ‘एएफसी चॅम्पियन्स लीग’मध्ये येत्या हंगामात खेळण्याची संधी मात्र चुकलीय. ‘अल-इतिहाद’ व ‘अल-हिलाल’ यांच्या पाठोपाठ त्यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलंय !

रोनाल्डोचे भीमपराक्रम...

  • क्रिस्तियानो रोनाल्डो देशातर्फे खेळताना गोल नोंदविणारा सर्वांत वयस्क खेळाडू ठरलाय (40 वर्षं 123 दिवस)...त्यानं मोडला तो पिएरे कालाल मुकेन्डी (37 वर्षं) यानं 1968 साली ‘एफकॉन’ स्पर्धेच्या अंतिम फेरीत घानाविरुद्ध नोंदविलेला विक्रम...
  • 40 वर्षं पूर्ण झाल्यानंतर एखाद्या प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम फेरीत गोल नोंदविणारा रोनाल्डो हा इतिहासातील पहिलवहिला खेळाडू...
  • उपांत्य फेरीत जर्मनीविरुद्ध नोंदविलेल्या गोलासरशी रोनाल्डोनं चाळिशी ओलांडल्यानंतर ‘नेशन्स लीग’ स्पर्धेत कुठल्याही स्तरावर अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू ठरण्याचा मान मिळविला. यापूर्वी जिब्राल्टरच्या रॉय चिपोलिनानं (39 वर्ष 246 दिवस) बल्गेरियाविरुद्ध 2022 साली गोल नोंदविला होता...
  • ‘नेशन्स लीग’मध्ये क्रिस्तियानोनं केलेले 8 गोल हे ‘अ’ श्रेणीच्या स्पर्धेतील सर्वांत जास्त...त्याला संधी मिळालीय ती हा चषक दोन वेळा उचलण्याची. यापूर्वी 2019 साली रोनाल्डोच्या पोर्तुगालनं पहिल्यांदा ही स्पर्धा जिंकली होती...
  • याशिवाय क्रिस्तियानोनं क्लब पातळीवर सर्वांत जास्त 800 गोलांची नोंद केलीय. त्यात समावेश स्पोर्टिंगतर्फे 5, मँचेस्टर युनायटेडतर्फे 145, रेयाल माद्रिदतर्फे 450, युवेन्तसतर्फे 101 आणि अल-नासरतर्फे 99 गोलांचा... रोनाल्डो इतका ‘फिट’ कसा ?...
  • बहुतेक फुटबॉलपटू 35 वर्षांच्या आसपास निवृत्त होत असताना क्रिस्तियानो रोनाल्डो मात्र चाळिशी ओलांडूनही नुसता उत्कृष्ट स्थितीत नाही, तर अतुलनीय तंदुरुस्ती नि सहनशक्तीचं दर्शन घडवितोय...ताज्या माहितीनुसार, त्याचं बायोलॉजिकल वय आहे फक्त 28.9 इतकं. हे कळल्यानंतर त्याला वेध लागलेत ते आणखी 10 वर्षं खेळण्याचे...पण त्याचं इंगित ते काय ?...
  • अलीकडेच दिलेल्या एका यु-ट्यूब मुलाखतीत पोर्तुगीज फुटबॉलपटूनं सांगितल्याप्रमाणं तो दिवसाला 17 हजार पावलं चालतो आणि किमान सात तास दर्जेदार झोप घेण्यास प्राधान्य देतो...‘मी माझं आयुष्य अशाच प्रकारे जगतो. मी सदोदित हालचाली करत असतो, मग तो फुटबॉल असो किंवा माझ्या मुलांसोबत खेळणं. झोप हे कदाचित माझ्याकडे असलेलं सर्वांत महत्त्वाचं साधन. त्यातूनच तुम्ही खरोखर सावरून ‘रीसेट’ होऊ शकता’, रोनाल्डो माहिती देतो...तो सहसा रात्री 11 वा. झोपायला जातो आणि सकाळी 8.30 किंवा 8.45 पर्यंत ताणून देतो...
  • क्रिस्तियानोचा सराव, व्यायामाविषयीचा दृष्टिकोन पाहण्यासारखा...‘जेव्हा तुम्ही तऊण असता तेव्हा तुम्हाला वाटतं की, आपल्याला काहीही होऊ शकत नाही. पण जसजसं तुमचं वय वाढत जातं तसतसा फुटबॉलचा शारीरिक परिणाम जास्त होऊ लागतो. तुम्हाला त्याचं व्यवस्थापन करावं लागतं. स्मार्ट बनून गोष्टी वेगळ्या पद्धतीने हाताळाव्या लागतात. मी अनुभवातून हे शिकलोय’, तो म्हणतो...
  • रोनाल्डो सातत्यानं सराव, व्यायाम करत असतो, मग तो सामन्याचा दिवस असो वा नसो. तो एक तर मैदानावर दिसतो किंवा जिममध्ये...त्यानं घरातच अद्ययावत जिमची सोय केलेली असून ताकद वाढवण्यासाठी तो ‘वेट ट्रेनिंग’वर लक्ष केंद्रीत करतो, तर ‘कार्डिओव्हॅस्क्युलर’ तंदुऊस्तीसाठी आधार घेतो प्रिट्संचा. तीव्र शारीरिक हालचालींनंतर तितक्याच प्रमाणात शरीराला सावरण्यासाठी वेळ द्यायला हवा, असं त्याचं मत. म्हणून तो साहाय्य घेतो थंड पाण्यानं आंघोळ, क्रायोथेरेपी, कॉम्प्रेशन थेरेपी, सोना सत्रं अन् नियमित ‘स्ट्रेचिंग’चा...
  • सामन्यांमध्ये कामगिरी करण्याच्या दृष्टीनं शरीरासाठी इंधन या नजरेतून रोनाल्डो अन्नाकडे पाहतो. त्यामुळं तो भरपूर प्रमाणात ‘व्होल ग्रेdरन कार्ब्स’, फळं व भाज्यांसह उच्च प्रथिनंयुक्त आहार घेतो, तर साखरेचे अथवा प्रक्रिया केलेले पदार्थ टाळतो. माशांसारखं ‘लीन प्रोटीन’ त्याच्या एकदम पसंतीचं. त्याला नाश्त्यात चीज, हॅम, दही, फळं आणि एवाकडू टोस्ट खाणं आवडतं...
  • रोनाल्डो दररोज सहा वेळा खाद्यसेवन करतो, तेही दर 2 ते 4 तासांनी. यामुळं त्याचं ‘चयापचय’ क्रियाशील अन् उर्जेची पातळी स्थिर राहते. तो दिवसातून तब्बल सहा लिटर पाणी पितो...वडिलांचा दारूच्या व्यसनामुळं झालेला मृत्यू आणि 15 व्या वर्षी त्याच्या स्वत:च्या हृदयाच्या बाबतीत निर्माण झालेली समस्या यामुळं क्रिस्तियानो मद्यापासून चार हात दूर राहतो...

क्लब स्तरावर सर्वाधिक गोल करणारे खेळाडू...

  • खेळाडूचं नाव     नोंदविलेले गोल
  • क्रिस्तियानो रोनाल्डो         800
  • लायोनेल मेस्सी               753
  • जोसेफ बिकन                676
  • गर्ड म्युलर                     556
  • पुस्कास                        512

आंतरराष्ट्रीय स्तरावर देशातर्फे सर्वाधिक गोल नोंदविणारे खेळाडू

  • खेळाडू                           देश                गोल      सामने
  • क्रिस्तियानो रोनाल्डो         पोर्तुगाल            138      221
  • लायोनेल मेस्सी                अर्जेंटिना            112      193
  • अली दायी                       इराण                108      148
  • सुनील छेत्री                     भारत                95        155
  • मुख्तार दाहारी               मलेशिया            89        142
  • रोमेलू लुकाकू                 बेल्जियम            89        124
  • अली माबखौत                 यूएई                 85        115
  • रॉबर्ट लेवांडोव्हस्की         पोलंड                 85        158
  • फेरेन्क पुस्कास                हंगेरी                 84        85
  • गॉडफ्रे चितालू                 झाम्बिया              79        111
  • नेमार                              ब्राझील              79        128

- राजू प्रभू

Advertisement
Tags :

.